प्रतिनिधी / बेळगाव
गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र यांनी गुरुवारी सकाळी हिंडलगा मध्यवर्ती कारागृहाला भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली. याचवेळी शिक्षणमंत्री बी. सी. नागेश यांनीही कारागृहात जाऊन स्वातंत्र्यवीर सावरकरांचे वास्तव्य कोठे होते, याची पाहणी केली.
गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र यांच्यासमवेत पोलीस आयुक्त एम. बी. बोरलिंगय्या, कारागृहाचे मुख्य अधीक्षक कृष्णकुमार आदी अधिकारी उपस्थित होते. कारागृहाचा फेरफटका मारून गृहमंत्र्यांनी गांजा, बेकायदा मोबाईल रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.
काही कैद्यांशी चर्चा करून कारागृहात अन्न-पाण्याची व्यवस्था कशी आहे, हे जाणून घेतले. अनेक कैद्यांनी गृहमंत्र्यांसमोर आपले गाऱ्हाणे मांडले. दरम्यान, गुरुवारी हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.