Tarun Bharat

घरोघरी पाणी देणारे गोवा पाहिले राज्य

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन : सांखळी रवींद्र भवनात जलशक्ती अभियानाचा शुभारंभ

प्रतिनिधी / सांखळी

Advertisements

पावसात मुबलक पाणी व एप्रिल, मे महिन्यात पाण्यासाठी वणवण अशी अवस्था  असते. यावर उपाययोजना म्हणून पावसाचे पाणी जमिनीत जास्तीत जास्त साठवण्यासाठी ‘जलशक्ती’ अभियान राज्यात राबवले जात आहे. यासाठी जनता  व सरकारने संघटितपणे काम केले तर मोठे कार्य घडू शकते. या अभियानात  विद्यार्थी वर्गालाही सामील करून घेत पाण्याचे महत्त्व पटविणे हा हेतू आहे. प्रत्येक शेतकरी, विद्यार्थी व प्रत्येक घटकाने जलशक्ती अभियानात आपले योगदान देऊन जलसाठे अधिक मजबूत करण्यावर भर द्यावा. यासाठी सरकार सर्व ते सहकार्य देण्यास तयार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी सांखळीत केले.

जलसंपदा खात्यातर्पे सांखळी रवींद्र भवनात जलशक्ती अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जलसंपदामंत्री सुभाष शिरोडकर, आमदार डॉ. चंद्रकांत शेटय़े, आमदार प्रेमेंद्र शेट, मुख्य अभियंता प्रमोद बदामी, शुभदा सावईकर, आनंद काणेकर, पंच गुरुप्रसाद नाईक आदींची उपस्थितीती होती. संपूर्ण देशात गोवा हे राज्य प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी पुरवणारे पहिले राज्य ठरले आहे. फुकट मिळते त्याला किंमत नसते. पाणी अडवणे, साठवणे व शेतीसाठी वापरात यावे, यासाठी पंतप्रधान मोदींनी अभियान आखलेले असून संपूर्ण गोव्यात हे यशस्वी करण्याचा आमचा संकल्प असल्याचे मुख्यमंत्री डॉ सावंत यांनी सांगितले. या जलशक्ती अभियानातून शाश्वत विकास निर्माण करणे, जलसंधारणाबाबत संवेदनशीलता व जलसंपत्तीबाबत जागरूकता निर्माण करणे हा सरकारचा उद्देश असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

खाण खंदकातील पाणी वापरण्याचा प्रयोग यशस्वी!

मोठय़ांसोबतच लहान मुलांनादेखील पाणी संवर्धनाचे महत्त्व शिकण्याची गरज आहे. राज्यात 6 धरणे विविध ठिकाणी असल्याने सध्या धोका नाही, परंतु भविष्यात संकट येऊ शकते. सरकारने अडीच कोटी रुपये खर्चून कुडणे-सुर्ला गावांत खाणीच्या खंदकातील पाणी शेती व्यवसायासाठी वापरण्याचा देशातील पहिला  प्रयोग यशस्वी केला आहे. भविष्यात इतर खंदकातील पाण्याचा देखील असाच वापर करण्याचा विचार आहे. सरकारने मुख्यतः धरणे ही शेती व्यवसायासाठी पाणीपुरवठा करण्यासाठी बांधलेली आहे. असे असूनही एकाही शेतकऱयाने पाणी पुरवठय़ासाठी सरकारकडे अर्ज केला नसल्याची खंत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली.

पाणी साठविण्यासाठी पंधरा हजार खड्डे खोदणार : मंत्री शिरोडकर

 जलशक्ती अभियान हे आगामी पिढीसाठी वरदान असून मुबलक भूजल साठे   उपलब्ध व्हावे यासाठी प्रत्येक घरातून जलसंवर्धन होणे गरजेचे असून त्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे. यासाठी विद्यार्थी दशेपासून पाण्याचे महत्त्व पटवून मुलांना प्रोत्साहन देण्याचा संकल्प असल्याचे जलसंपदामंत्री सुभाष शिरोडकर म्हणाले.

तसेच 15 जुलैपर्यंत 15 हजार खड्डे तयार करून पाणी साठवण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच पुढील एप्रिल व मे महिन्यापूर्वी प्रत्येक मतदारसंघात 10 ते 12 नवीन बंधारे बांधण्याचा निश्चय मंत्री शिरोडकर यांनी केला आहे.

 या अभियाना अंतर्गत जी विद्यालये चांगल्या प्रकारे जलसंवर्धन करतील. त्यांना खात्यामार्फत रोख बक्षिसे दिली जातील. प्रत्येक तालुक्मयात 2 बक्षिसे दिली जातील, पहिले रोख रु. 50,000 तर दुसरे रोख रु. 25,000 अशी बक्षिसांचे स्वरुप आहे. तसेच जे शेतकरी आपल्या शेतात छोटय़ा स्वरूपात पाणी संवर्धनाचे पिठे तयार करतील त्यांनादेखील खात्यातर्फे अनुदान देण्यात येईल. असेही सांगण्यात आले

यावेळी मान्यवरांच्या हस्ते पाणी वाटप संस्थांना अनुदान तसेच शेतकऱयांना बियाणे आदी वाटप करण्यात आले

आमदार डॉ चंद्रकांत  शेटय़े व आमदार प्रेमेंद्र शेट यांनी पावसाचे पाणी साठवून त्याचे जमिनीत झिरपणे तसेच विविध माध्यमातून ते साठवणे गरजेचे असल्याचे संगितले

मुख्य अभियंता प्रमोद बदामी यांनी जलशक्ती अभियान तसेच राज्यातील एकूण जलसंपदा उपलब्धता या बाबत माहिती दिली. यावेळी मोठय़ा संख्येने शेतकरी विद्यार्थी नागरिक उपस्थित होते. मुख्यमंत्री डॉ सावंत यांनी जलसंवर्धनाची शपथ दिली .सूत्रसंचालन गिरीश वेळगेकर  यांनी केले.

Related Stories

कासावलीच्या नुतन हॉस्पिटल प्रकल्पाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

Amit Kulkarni

हरमल किनाऱयावर काळय़ा रंगाचे तेलगोळे

Amit Kulkarni

कुडचडे मतदारसंघात भाजप, काँग्रेसमध्येच प्रमुख लढत

Patil_p

पणजी महापालिकेच्या महसूली उत्पन्नात मोठी घट

Omkar B

धोकादायक पोर्तुगीजकालीन घरांची पाहणी करणार

tarunbharat

शेल्डे येथे व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन

Amit Kulkarni
error: Content is protected !!