प्रतिनिधी /सांखळी
कुडणे-सांखळी येथील श्री देव कुडणेश्वर देवस्थानचा वार्षिक श्री कुडणेश्वर महालक्ष्मी होमकुंड जत्रौत्सव गुरूवार 21 एप्रिल रोजी साजरा होणार आहे.
या निमित्त 21 एप्रिल रोजी सकाळी 6 वा. श्रींच्या मुर्तीस अभिषेक, तद्नंतर दु. 4 वा. नवीन धोंडगणांना मानवण्याचा कार्यक्रम होईल. सायं. 5 वा. श्री देवी सातेरीला बालधोंडगणासमवेत ओटीचा मान अर्पण करण्यात येईल. सायं. 6 वा. श्रींचे श्री देवी सातेरी मंदिराजवळील तळीवर स्नानासाठी आगमन होईल. याठिकाणी सुवासिनींतर्फे देवीची ओटी भरण्याचा कार्यक्रम होईल.
रात्रौ 11 वा. हरवळे येथून श्री देव रूद्रेश्वराकडून येणारी ओटी. फुले, फळांची भेट स्वीकारण्यात येईल. रात्री 1 वा. पर्यंत गावातील प्रत्येक वाडय़ावाडय़ावरून धोंडगण ढोल-ताशांच्या गजरात मंदिरात प्रवेश करतील. नंतर देवीला मंदिराच्या प्रांगणात नाचवण्यात येईल. पहाटे 2 वा. च्या दरम्यान होमकुंडास अग्नी देण्यात येईल. तद्नंतर श्री देव रवळनाथ मंदिरात सर्व धोंडगण कृपाप्रसाद घेतल्यानंतर होमकुंड प्रवेश करणार आहे. पहाटे 5 वा. च्या दरम्यान देवीचा अग्नीप्रवेश होईल व नंतर मंदिराच्या मंडपात भक्तगणासाठी कौल होईल. 22 एप्रिल रोजी रात्रौ 10 वा. फळाफुलांची पावणी व तद्नंतर श्री साई कला मंडळ, सागोल्डातर्फे वसंत कानेटकर लिखित व अविनाश पुर्खे दिग्दर्शित ‘इथे ओशाळला मृत्यू’ या एतिहासिक नाटकाचा प्रयोग सादर होईल. 23 एप्रिल रोजी रात्रौ 10 वा. फळाफुलांची पावणी व नंतर यशप्रभा, पणजीतर्फे वसंत कानेटकर लिखित व पुरूषोत्तम पै. दिग्दर्शित संगीत ‘मत्स्यगंधा’ नाटक सादर होईल. 24 एप्रिल रोजी रात्रौ 10.30 वा. आमोणे युथतर्फे ‘शुभमंगल सावधान’ हे दोन अंकी विनोदी नाटक सादर होईल.