देवस्थान जमिनीच्या वादातून अधिकाऱयांशी चर्चा : जमीन परत मिळविण्यासाठी ग्रामस्थ एकवटले
प्रतिनिधी / बेळगाव
होनीहाळ (ता. बेळगाव) येथील श्री महालक्ष्मी मंदिराच्या जमिनीच्या वादाच्या पार्श्वभूमीवर गावकऱयांनी गुरुवारी ग्रामीण विभागाच्या एसीपी कार्यालयाला धडक दिली. देवस्थानशी संबंधित जमिनीची विक्री करण्यात आली आहे. ही जमीन परत मिळविण्यासाठी गावकरी एकवटले आहेत.
बेळगाव ग्रामीण विभागाचे भाजप नेते धनंजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली होनीहाळ येथील गावकरी एसीपी कार्यालयासमोर दाखल झाले. काही प्रमुख कार्यकर्त्यांनी एसीपी गणपती गुडाजी यांच्याशी चर्चा केली. मारिहाळ पोलीस स्थानकात गावकऱयांविरुद्ध फिर्याद दाखल करण्यात येत आहे. यासाठी आपण एसीपी कार्यालयासमोर ठाण मांडल्याचे गावकऱयांनी सांगितले.
जमिनीचा व्यवहार बेकायदेशीर
माजी जिल्हा पंचायत सदस्य नागेश देसाई यांनी ही जमीन खरेदी केली आहे. देवस्थानच्या जमिनीची खरेदी होत नाही. हा व्यवहार बेकायदेशीर आहे. महालक्ष्मी देवस्थानची जमीन देवस्थानला परत मिळावी, यासाठी गावकरी एकवटले आहेत. कायदेशीर प्रक्रियाही सुरू असल्याचे धनंजय जाधव यांनी सांगितले.
पत्रकारांशी बोलताना नागेश देसाई म्हणाले, काही वर्षांपूर्वी आपण ही जमीन खरेदी केली आहे. आता दुसऱयाला या जमिनीतील काही भाग विक्री करण्यात आला आहे. हा व्यवहार कायदेशीर आहे. आपण देवस्थानची जमीन बळकावली नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. महालक्ष्मी देवस्थानच्या जमिनीच्या मुद्दय़ावरून वातावरण तापले आहे.