होनकल-लोंढा-रामनगर-अनमोड महामार्ग दुपदरीकरणाचे काम पावसाळय़ापूर्वी पूर्ण करण्याचा विचार
प्रतिनिधी /खानापूर
बेळगाव-पणजी राष्ट्रीय महामार्गापैकी दुसऱया टप्प्यातील होनकल, लोंढा, रामनगर ते अनमोड महामार्ग दुपदरीकरणाचे काम गेल्या दोन वर्षापासून विविध कारणांमुळे बंद पडले होते. अखेर या कामासाठी फेरनिविदा काढण्यात आली. ती फेरनिविदा पुण्याच्या व्ही. एम. मतारे कंपनीला मंजूर झाली होती. आता त्या कंपनीच्या सब कॉन्ट्रक्टरने प्रत्यक्ष कामाला प्रारंभ केला आहे. यामुळे या महामार्गाशी संबंधित असलेल्या जवळपास 40 गावातील जनतेमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या महामार्ग दुपदरीकरणाच्या कामाची सुरुवात शुक्रवारी होनकलजवळून करण्यात आली. यावेळी सब कॉन्ट्रक्टर असलेल्या एल. एन. माळवीया इन्फ्रॉ प्रा. लिमिटेड कंपनीचे प्रतिनिधी एल. एन. माळवीया तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, प्रमुख कंत्राटदार व्ही. एम. मतारे, इन्फ्रॉ प्रोजेक्ट लि. पुणे इपीसी कंत्राटदार, सामाजिक कार्यकर्ते आप्पाण्णा गोरल व परिसरातील नागरिक उपस्थित होते. आता पावसाळय़ापूर्वी पॅचवर्कचे काम पूर्ण केले जाणार आहे. यामुळे पावसाळय़ातही मुख्य वाहतुकीस कोणताही अडथळा येऊ नये, याची दक्षता घेतली जाणार आहे. तसेच पावसाळय़ानंतर युद्धपातळीवर काम करून पुढील पावसाळय़ापूर्वी रस्त्याचे काम पूर्ण होण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.