पुणे / वार्ताहर :
पुण्यातील मानाच्या पाच गणपतींसह अखिल मंडई, दगडूशेठ व अन्य मंडळांच्या गणरायांची प्राणप्रतिष्ठा बुधवारी दुपारपर्यंत भक्तिभावात व वाजतगाजत मिरवणुकीने करण्यात येणार आहे.
पुण्यनगरीचे ग्रामदैवत श्री कसबा गणपती या मानाच्या पहिल्या गणपतीची प्रतिष्ठापना बुधवारी सकाळी 11 वाजून 37 मिनिटांनी होणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून हुतात्मे स्वातंत्र्यसैनिक अशा देशासाठी बलिदान दिलेल्यांचा सन्मान म्हणून यावषी हुतात्मा राजगुरू यांचे नातू धैर्यशील व सत्यशील यांच्या हस्ते श्रींची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. तत्पूर्वी सकाळी 8.15 वाजता श्रींची मिरवणूक निघणार असून, संघर्ष, वाद्यवृंद, श्रीराम पथक आणि प्रभात बँड मिरवणुकीत सहभागी होणार आहेत.
अधिक वाचा : पुण्यात मानाच्या गणपतींविरोधात बंड
मानाच्या दुसऱ्या श्री तांबडी जोगेश्वरी मंडळाच्या श्रींच्या आगमनाची मिरवणूक बुधवारी सकाळी ठीक 10.30 वाजता नारायण पेठेतील न. चिं. केळकर रस्त्यावरील मंदार लॉज येथून कुंटे चौक, गणपती चौकमार्गे उत्सव मंडपात पोहोचणार आहे. चांदीच्या पालखीत विराजमान झालेली गणेशमूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेईल. मिरवणुकीत आढाव बंधूंचे नगारावादन, न्यू गंधर्व ब्रास बँन्ड, शिवमुद्रा ढोलताशा पथकासह अन्य पथके सहभागी होतील. श्रींची प्राणप्रतिष्ठापना दुपारी 12.30 वाजता सनई-चौघडा व संबळच्या कर्णमधूर साथीत होईल.
मानाच्या तिसऱ्या गुरुजी तालीम मंडळाच्या श्रींची प्राणप्रतिष्ठापना दुपारी 2 वाजून 10 मिनिटांनी पुनीत व जान्हवी बालन यांच्या हस्ते होणार आहे. श्रींच्या आगमनाची मिरवणूक सकाळी 10.30 वाजता गणपती चौकातून सुरु होईल. मिरवणुकीत जयंत नगरकर यांचे नगारा वादन, अतुल बेहरे यांचे महिलांचे नादब्रह्म पथक व अन्य पथकांचा समावेश आहे. सुभाष सरपाले व स्वप्नील सरपाले यांनी बनविलेल्या आकर्षक फुलांच्या रथातून श्रींची मिरवणूक निघेल.
मानाच्या चौथ्या श्री तुळशीबाग गणपती मंडळाच्या श्रींची प्राणप्रतिष्ठापना दुपारी 2.30 वाजता उद्योजक पुनीत व जान्हवी बालन यांच्या हस्ते होणार आहे. तत्पूर्वी सकाळी 11 वाजता मिरवणूक निघणार असून, त्यात शिवगर्जना, समर्थ प्रतिष्ठापना, उगम ही पथके सहभागी होणार आहेत. मानाचा पाचवा गणपती असलेल्या केसरीवाडा गणेशोत्सवाच्या श्रींची प्राणप्रतिष्ठापना सकाळी 10.30 वाजता डॉ. रोहित टिळक यांच्या हस्ते होणार आहे. त्यापूर्वी सकाळी 10 वाजता रमणबाग चौक ते केसरीवाडय़ापर्यंत चांदीच्या पालखीत श्रींची मिरवणूक काढली जाणार आहे. मिरवणुकीत श्रीराम पथक, शिवमुद्रा ढोलताशा पथक आणि बिडवे बंधूंचे नगारा वादन होईल.
अखिल मंडई मंडळाच्या शारदा गजाननाची आगमन मिरवणूक फुलांनी सजलेल्या मंगल कलश रथातून सकाळी 9 वाजता निघणार आहे. तर बुधवारी दुपारी 12 वाजता श्रींची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. मंगळवार पेठेतील श्री स्वामी समर्थ मठाचे प्रमुख प्रतापकाका अनंत गोगावले आणि त्यांच्या पत्नी अपर्णा गोगावले यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. रंगबेरंगी आरसे आणि झुंबराने सजलेल्या भव्य स्वप्नमहालात हलत्या झोपाळय़ावर शारदा गजानन विराजमान होणार आहेत.
दगडूशेठच्या विद्युतरोषणाईचे चंद्रकांतदादांच्या हस्ते उद्घाटन
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या श्रींची प्राणप्रतिष्ठापना सकाळी 11 वाजून 37 मिनिटांनी गुजरात गिरनार येथील गुरु दत्तात्रेय पिठाधीश्वर स्वामी श्री महेशगिरी महाराज यांच्या हस्ते होईल. मंडळाने यंदा पंचकेदार मंदिर साकारले असून, मंदिरावरील विद्युतरोषणाईचे उद्घाटन सायंकाळी 7 वाजता राज्याचे उच्च तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग व संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होईल. प्राणप्रतिष्ठापनेपूर्वी सकाळी 8.30 वाजता मुख्य मंदिरापासून गरुड रथातून श्रींची आगमन मिरवणूक काढण्यात येणार आहे. फुलांनी साकारलेले गरुड रथावर लावण्यात येणार आहेत. देवळणकर बंधूचा चौघडा, गायकवाड बंधू सनई, दरबार बँड, प्रभात बँड आणि गंधक्ष ढोल-ताशा पथकाचा मिरवणुकीत सहभाग असणार आहे.