प्रतिनिधी/ बेळगाव
दि बेळगाव तालुका रुरल इंडस्ट्रियल को-ऑप. सोसायटीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव कार्यक्रम सोसायटीच्या कार्यालयात पार पडला. कार्यक्रमाला ऍड. विवेक कुलकर्णी (एकसंबेकर) उपस्थित होते.
रणझुंझार हायस्कूलच्या मुलींनी स्वागतगीत सादर केले. सोसायटीचे चेअरमन रमेश मोदगेकर, व्हाईस चेअरमन रघुनाथ पाटील व ऍड. विवेक कुलकर्णी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करण्यात आले. पाहुण्यांचा परिचय विनायक गोदे यांनी करून दिला. रमेश मोदगेकर यांनी स्वागत केले. यावेळी सभासदांच्या गुणी मुलांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दहावी, बारावी, डिप्लोमा, पदवी, इंजिनिअरिंग, एमबीबीएस यासह विविध अभ्यासक्रमात यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला.
ऍड. विवेक कुलकर्णी यांनी करिअरविषयी मार्गदर्शन करत ज्या विषयात विद्यार्थ्यांना आवड आहे, त्याच विषयात त्यांनी करिअर करावे, असे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी शिक्षण घेताना विविध संस्थांकडून अर्थसाहाय्य घेऊन उच्चशिक्षण घ्यावे, असे त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन जयवंत खन्नुकर यांनी केले. कृष्णराव मोदगेकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाला संचालक मंडळ, शाखा कमिटी सदस्य, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.