प्रतिनिधी / बेळगाव
सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रिय समाज शहापूर, बेळगाव ज्येष्ठ नागरिक संघटनेच्यावतीने आयोजित 70 वर्षे पूर्ण झालेल्या सभासदांचा व 2021-22 मध्ये निवृत्त झालेल्या समाजबांधवांचा सत्कार रविवारी झाला. दीपप्रज्वलन करून प्रेरणागीत झाल्यानंतर संघटनेचे अध्यक्ष अनिल पवार यांनी संघटनेच्या आतापर्यंत झालेल्या कार्यक्रमाची सविस्तर माहिती दिली. यानंतर सेपेटरी सतीश कल्पवृक्ष यांनी संघटना स्थापन करण्याचा उद्देश सांगितला.
यावेळी 70 वर्षे पूर्ण झालेल्या सभासदांचा सत्कार व जे समाजबांधव सन 2021-22 सालामध्ये निवृत्त झाले आहेत, त्यांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आला. ऑगस्ट महिन्यात ज्या सभासदांचे वाढदिवस होते, त्यांना पुष्पगुच्छ देऊन संघटनेच्यावतीने भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. सर्व समाजबांधवांना अल्पोपाहार देण्यात आल्यानंतर संगीत कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
याप्रसंगी गजानन रतन, शीला धोंगडी, रत्ना शिराळकर यांनी मराठी, हिंदी गाणी सादर केली. वासंती कोसंदल यांनी ज्येष्ठ नागरिकांवर कविता सादर केली. सदर कार्यक्रमात रमेश धोंगडी व प्रभाकर चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन गोपाळ मिरजकर यांनी केले. रमेश धोंगडी यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अनिल पवार यांनी परिश्रम घेतले.