जुन्या पी.बी.रोडवरील घटना : वृद्ध आई-वडिलांसमोरच मुलाला संपविले
प्रतिनिधी/ बेळगाव
किरकोळ अपघात व त्यानंतर झालेल्या वादावादीनंतर हलगा येथील एका कार मेकॅनिकचा भीषण खून करण्यात आला आहे. शनिवारी रात्री जुन्या पी. बी. रोडवर ही घटना घडली असून वृद्ध आई-वडिलांसमोरच टोळक्मयाने मुलाचा बळी घेतला आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली असून खुनानंतर आरोपी फरारी झाले आहेत.
महेश ज्ञानेश्वर कामाण्णाचे (वय 35, रा. तारिहाळ रोड, विजयनगर, हलगा) असे खून झालेल्या दुर्दैवी युवकाचे नाव आहे. त्याच्या वृद्ध आई-वडिलांसमोरच जांबियाने वार करून त्याचा बळी घेण्यात आला आहे. याप्रकरणी सहा अज्ञातांविरुद्ध भा.दं.वि. 143, 147, 148, 341, 323, 302, 504 सहकलम 149 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती समजताच शहापूरचे पोलीस निरीक्षक विनायक बडीगेर, उपनिरीक्षक मंजुनाथ व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी धाव घेतली. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महेशला रात्री खासगी इस्पितळात हलविण्यात आले. उपचाराचा उपयोग न होता रात्री उशिरा त्याचा मृत्यू झाला. यावेळी झालेल्या झटापटीत महेशच्या वडिलांसह सहा जण जखमी झाले आहेत.
ज्ञानेश्वर लुमाणी कामाण्णाचे (वय 67, रा. हलगा), दीपक दुद्दाप्पा मुतगेकर (वय 26, रा. बस्तवाड), सागर तुकाराम भारती (वय 20, अरळीकट्टी, देशपांडे गल्ली, बेळगाव), राहुल भाऊराव कुकडोळकर (वय 22, रा. सुळगा-येळ्ळूर), काशिनाथ गंगाधर मयेकर (वय 24, रा. कारभार गल्ली, वडगाव), सोमनाथ रणजीत नावगेकर (वय 21, रा. सुळगा-येळ्ळूर) अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत.
उपलब्ध माहितीनुसार महेश उप्पार गल्ली, खासबाग येथे प्रसाद ऑटो गॅरेज चालवित होता. शुक्रवार दि. 13 रोजी सायंकाळी आपल्या गॅरेजमध्ये रिपेरीसाठी आलेली वॅगेनार कार मालकाला घेऊन तो ट्रायलसाठी गेला होता. जुन्या पी. बी. रोडवरील धाकोजी हॉस्पिटलसमोर एका मोटारसायकलची कारला धडक बसली. त्यावेळी महेशने आपली कार थांबविली. मोटारसायकलस्वाराने खाली उतरून कारची चावी काढून घेतली व शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
त्यावेळी उभयतांत वादावादी झाली. महेशने गॅरेजमधील कामगारांना बोलावून घेतले. मोटारसायकलस्वारानेही आपल्या साथीदारांना बोलावून घेतले. ते दाखल झाल्यानंतर वादावादी होऊन महेशवर जांबियाने वार करण्यात आले. यावेळी भांडण सोडविण्यासाठी गेलेले महेशचे वडील व त्याच्या कामगारांवरही हल्ला करण्यात आला. सायकल चेननेही त्यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे.
आई–वडीलही थांबले
ही घटना घडली त्याचवेळी महेशचे वडील ज्ञानेश्वर व आई लक्ष्मी या मार्गावरून दवाखान्याला जात होते. आपल्या मुलासोबत कोणी तरी भांडण काढले असल्याचे पाहून ते तेथे थांबले. भांडण कशासाठी करता कारची चावी द्या, अशी वडिलांनी विनंती केली. तरीही मोटारसायकलस्वाराने शिवीगाळ करीत चावी देणार नाही, काय करून घ्यायचे ते करा, असे धमकावत मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याच्या सोबत आलेल्या साथीदारांनीही हल्ला केल्याचे पोलिसांनी सांगितले. शहापूर पोलीस पुढील तपास करीत आहेत. वृद्ध आई-वडिलांसमोरच एकुलत्या मुलाचा खून करण्यात आला आहे. त्यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.