अमृतसर / वृत्तसंस्था
पंजाबमधील अमृतसर येथे गुरुनानक हॉस्पिटलमध्ये शनिवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या दुर्घटनेनंतर 650 रुग्णांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. ओपीडीच्या मागील बाजूस आणि एक्स-रे युनिटजवळील दोन ट्रान्स्फॉर्मरचा अचानक स्फोट झाल्याने ही आग लागली. हे दोन्ही ट्रान्स्फॉर्मर संपूर्ण हॉस्पिटलला वीजपुरवठा करत होते. या दोन ट्रान्स्फॉर्मरच्या बाजूलाच असलेल्या वॉर्डमध्ये 650 रुग्ण उपचारासाठी दाखल होते. आगीची माहिती मिळताच सर्व रुग्णांना तातडीने बाहेर काढण्यात आले. आग इतकी झपाटय़ाने पसरली की काही वेळातच संपूर्ण हॉस्पिटल धुराच्या ज्वाळांनी वेढले गेले. आग विझवून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते.