वृत्तसंस्था /नवी दिल्ली
मार्च 2023 पासून महिला आयपीएल स्पर्धा खेळवली जाणार असून स्पर्धेत 5 महिला संघांचा समावेश असणार आहे. सहभागी संघ परस्परांविरुद्ध प्रत्येकी 2 सामने खेळतील आणि साखळी फेरीअखेर टेबलटॉपर्स 2 संघ अंतिम फेरीसाठी थेट पात्र ठरणार आहेत. दुसऱया व तिसऱया क्रमांकाचे संघ एलिमिनेटर लढतीच्या माध्यमातून निश्चित होतील. प्रत्येक संघाला प्लेईंंग इलेव्हनमध्ये कमाल 5 विदेशी खेळाडू निवडता येणार आहेत.
सध्या महिला गटात ऑस्ट्रेलियात बिग बॅश लीग व युकेमध्ये द हंड्रेड स्पर्धेत 15 खेळाडूंच्या संघात जास्तीत जास्त 3 विदेशी खेळाडूंना संधी दिली जाते. मात्र, स्थानिक व आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा योग्य समन्वय साधता यावा, यासाठी कमाल 5 विदेशी खेळाडू निवडण्याची मुभा दिली असल्याचे बीसीसीआयने म्हटले आहे.
महिलांची आयपीएल स्पर्धा पुरुषांच्या आयपीएलपूर्वी खेळवण्याचा मंडळाचा विचार आहे. पुढील वर्षी दि. 9 ते 26 फेब्रुवारी या कालावधीत दक्षिण आफ्रिकेत आयोजित महिला टी-20 वर्ल्डकपनंतर प्रस्तावित महिला आयपीएल खेळवली जाईल, असे संकेत आहेत. धरमशाला/जम्मू (नॉर्थ झोन), पुणे/राजकोट (वेस्ट), इंदोर/नागपूर/रायपूर (सेंट्रल), रांची/कटक (ईस्ट), कोची/विशाखापट्टणम (साऊथ) व गुवाहाटी (नॉर्थ-ईस्ट) या प्रत्येक झोनमधून नवे संघ निश्चित केले जाणार आहेत.