Tarun Bharat

खैरवाड येथे भरदुपारी घरफोडी

तीन तोळे सोने, रोख पंच्याहत्तर हजारासह दहा तोळे चांदी लंपास

प्रतिनिधी /खानापूर

तालुक्यातील खैरवाड येथे भरदुपारी नागाप्पा अप्पाण्णा भुजगुरव यांच्या घरी   धाडसी चोरी करून चोरट्यांनी तीन तोळे सोने व रोख पंच्याहत्तर हजार व दहा तोळे चांदी असा ऐवज लंपास केला आहे. नंदगड पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मात्र तक्रार नोंदवून घेतली नाही. यामुळे खैरवाड ग्रामस्थातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

  खैरवाड येथील नागाप्पा भुजगुरव हे शेतात भात मळणी करण्यासाठी सकाळी आठ वाजता गेले होते. त्यानंतर सकाळी अकरा वाजता  त्यांच्या पत्नी चंद्रभागा या जेवण घेऊन गेल्या होत्या. घर बंद असलेले पाहून चोरट्यांनी घराचा मागील दरवाजा तोडून आत प्रवेश केला. घरातील तिजोरी तोडून त्यात ठेवलेले 75 हजार ऊपये आणि तीन तोळे सोने, दहा तोळे चांदी  घेऊन चोरट्यांनी पलायन केले आहे. दुपारी +दोन वाजता चंद्रभागा या घरी परत आल्यावर समोरचा दरवाजा आतून बंद असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी घरच्या मागील बाजूला जाऊन पाहिले असता मागचा दरवाजा तोडलेला होता.

तातडीने त्यांनी शेजारील लोकांना बोलावून घरात प्रवेश केला तर घरातील तिजोरी तोडून साहित्य व कपडे अस्ताव्यस्त पसरलेले नजरेस पडले. शेतात मळणी करत असलेल्या आपल्या पतीला यांची त्यांनी कल्पना दिली.

तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ

नागाप्पा भुजगुरव यांनी शेतातून येऊन पाहिले असता भात विक्रीची रक्कम पंच्याहत्तर हजार व सोने-चांदीच ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याचे निदर्शनास आले. तातडीने याची माहिती त्यांनी नंदगड पोलिसांना दिली. घटनास्थळी दोन पोलिसांनी येऊन पाहणी करून माहिती घेतली. मात्र तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ केली. चोरीच्या घटनेची तक्रार घेण्यास नंदगड, खानापूर पोलीस कायमच टाळाटाळ करत आहेत. तसेच सोन्या-चांदीच्या ऐवजाची तसेच रोख रकमेची कमी प्रमाणात नोंद करण्यात येत असल्याची तक्रार अनेकांनी केली आहे. सोमवारी खैरवाड येथे भरदुपारी धाडसी चोरी करणाऱ्यांविरोधात तक्रार दाखल करून घेण्यात आली नाही.

 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी

सध्या सुगीचा हंगामाची लगबग सुरू आहे. त्यामुळे गावातील लोक शेतात आहेत. ही संधी साधून चोरटे आपला कार्यभाग साधून पसार होत आहेत. गेल्या महिनाभरात चोरटे पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे पोलीस मात्र सुस्त होताना दिसत आहेत. चोरट्यांना पोलिसांची भीती नसल्याचे दिसून येत आहे. याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

खुर्ची विक्रेत्यांवर संशय

एवढी मोठी चोरी झाल्यानंतरही नंदगड पोलीस स्थानकाचे निरीक्षक, उपनिरीक्षक घटनास्थळी गेले नाहीत. दोन पोलिसांनी पाहणी करून मंगळवारी किंवा बुधवारी पोलीस स्थानकात येण्यासाठी सांगून आल्याचे खैरवाड येथील ग्रामपंचायत सदस्य रुक्माणा झुंजवाडकर यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले. सोमवारी दुपारी काही खुर्ची विक्रेते गावात फिरत होते. ज्या घरी चोरी झाली त्या गल्लीतील क्रॉसपर्यंत हे खुर्ची विक्रेते बराच वेळ घुटमळत होते, असे सांगण्यात आले.

Related Stories

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर काळाचा घाला

Patil_p

निर्णय घेण्यासाठी स्थापणार पंधरा जणांची कमिटी

Amit Kulkarni

मुसळधार पावसामुळे कद्रा धरण तुडुंब

Amit Kulkarni

समाजाला विचार देणे महत्त्वाचे

Amit Kulkarni

तरुणांनी देशसेवेला वाहून घ्यावे

Patil_p

बसवण कुडचीत मरगाई देवीची प्रतिष्ठापना-कळसारोहण

Amit Kulkarni