बंद घराचा कडीकोयंडा तोडून दागिन्यांसह रोकड लांबविली : परिसरात खळबळ
प्रतिनिधी /बेळगाव
अन्सार गल्ली, पिरनवाडी येथील एका बंद घराचा कडीकोयंडा तोडून सव्वातीन लाखांचे दागिने व रोकड पळविण्यात आली आहे. बुधवारी सकाळी चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.
मराठी प्राथमिक शाळेच्या पाठिमागे शिक्षक बाबुसाब फकिरसाब नदाफ यांचे घर आहे. चोरटय़ांनी बाबुसाब यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून तिजोरीतील पाच तोळे सोन्याचे दागिने व 70 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण सव्वातीन लाख रुपयांचा ऐवज पळविला आहे. बुधवारी सकाळी चोरीचा हा प्रकार उघडकीस आला.
मोहरमनिमित्त शाळेला सुटी असल्याने बाबुसाब व त्यांचे कुटुंबीय बैलहोंगल तालुक्मयातील चिवटगुंडी या त्यांच्या मूळगावी गेले होते. त्यांचा मुलगा पहिल्या मजल्यावर राहतो. मंगळवारी रात्री 10 वाजता घराला कुलूप लावण्यात आला होता. बुधवारी सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास दरवाजा उघडा दिसला. त्यामुळे चोरीचा प्रकार उघडकीस आला.
चोरटय़ांनी किमती ऐवजांसाठी शोधाशोध केल्याने कपाटातील सर्व वस्तू विस्कटलेल्या अवस्थेत पडल्या होत्या. लहान तिजोरीत मोठय़ा तिजोरीच्या चाव्या होत्या. त्या चाव्यांनी तिजोरी उघडून दागिने व रोकड पळविण्यात आली. घटनेची माहिती समजताच बेळगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक श्रीनिवास हंडा, उपनिरीक्षक लक्काप्पा जोडट्टी व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. बेळगाव ग्रामीण पोलीस पुढील तपास करीत आहेत.