पुरणपोळीसह अन्य गोड पदार्थांचा नैवद्य; सुवासिनींनी ववसा पूजन करून घेतले दर्शन
कोल्हापूर/प्रतिनिधी
गौराईच्या पाठोपाठ रविवारी घरोघरी शंकरोबाचे आगमन झाले. शंकरोबाच्या आगमनावेळी सुवासिनींनी पिंगा घालत फुगडीचा फेर धरला. गौराईच्या शेजारी शंकरोबाची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर पुरणपोळीसह विविध गोड पदार्थांचा नैवद्य दाखवण्यात आला. सुवासिनींनी गौरी-शंकरोबाला हात जोडून आमच्या कुटुंबांना सुखी ठेवण्याची आर्त विनवनी केली.
कोरोनानंतर पहिल्यांदाच गौरी-गणपती सण मोठया उत्साहात साजरा केला जात आहे. गौरी आणि शंकरोबाच्या आगमनासाठी पंचगंगा घाटावर सुविसिनींनी नटून-थटून मोठी गर्दी केली होती. शनिवारी गौराई तर रविवारी शंकरोबाच्या ढहाळ्यांना पंचगंगा नदीसह घरातील पाण्याने स्नान घालून पूजन केले. पारंपारिक वाद्यांच्या गजरात शंकरोबाला घरात घेतले. दुपारी शंकरोबाची प्रतिष्ठापना करून पुरनपोळीचा नैवद्य दाखवला. दरम्यान ववसा पूजन करून सुवासिनींनी गौराईची ओटी भरली. घरोघरी पुरण-पोळीसह गोड-धोड जेवनाचा बेत केला होता. रविवारी रात्री उशिरापर्यंत पेठा-पेठांमध्ये गौराईच्या गाण्यांवर महिलांनी फेर धरला होता. पिंगा, काटवटकणा, झिम्मा-फुगडी, घोडा, छिय्या-फु आदींसह विविध खेळ खेळण्य़ाचा आनंद महिलांनी लुटला. रविवारी महिला, मुली नटून-थटून फिरताना त्यांच्या चेहऱयावर आनंद दिसत होता.
पी ढबाकचा चांगला व्यवसाय
भारतीय सणांमध्ये गौरी-गणपती हा सण महिलांच्या आनंदोत्सवाचा मानला जातो. गौरीच्या आगमनापुर्वीपासूनच महिला पारंपरिक गाण्यांच्या तालावर फेर धरतात. मोठय़ा हौसेने पारंपरिक वेशभूषा करून पी-ढबाकच्या तालावर गौरी-शंकरोबाचे आगमन झाले. कोरोनात पी-ढबाकवाल्यांचा ठप्प झालेल्या व्यवसायाला अच्छे दिन आले आहेत. नदीपासून ते घरापर्यंत महिलांनी पी-ढबाकच्या तालावर गौरी-शंकरोबाचे आगमन झाले. परिणामी पी-ढबाकवाल्यांचे हजारो रूपयांचा फायदा झाला.