शैलेंद्र वेलिंगकर यांचा सवाल :महाघोटाळा झाल्याचा दावा
विशेष प्रतिनिधी /पणजी
गोवा वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 1294 जागा आरोग्य खाते तथा गोमेकॉने भरताना त्यातील 85 टक्के पेक्षा जास्त उमेदवार हे सत्तरीतीलच पात्र कसे ठरले? हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांच्या सांखळीतून देखील एखाद दुसऱयालाच संधी मिळालेली आहे. तथापि, भरती नियमाला फाटा देऊन ही भरती बेकायदेशीर असल्याचा दावा करून उच्च न्ययालयात गेलेल्या समाजसेवक शैलेंद्र वेलिंगकर यांनी हा प्रकार म्हणजे मोठा घोटाळाच आहे, असा दावा केला आहे.
गतवर्षी मार्च व साधारणतः ऑक्टोबर 2021 मध्ये अत्यंत घाईगडबडीत नियमांना बाजूला सारून काही व्यक्तींना सेवेत दाखल देखील करून घेतले. सेवेत घेताना वाळपई, पर्ये, केरी वगैरे संपूर्ण सत्तरी आणि वाळपई मतदारसंघात येणाऱया उसगावातील युवक-युवतींचा समावेश केलेला होता. गोव्यातील अन्य तालुक्यांतील किंवा अन्य मतदारसंघातील उमेदवार या नोकऱयांना पात्र नव्हते काय? असा सवाल उपस्थित झाला आहे.
ही नोकरभरती एक घोटाळाच
शैलेंद्र वेलिंगकर यांनी सांगितले की, गोमेकॉतील किंवा आरोग्य खात्यातील संपूर्ण नोकर भरती हा एक मोठा घोटाळाच आहे. नोकर भरती करताना कोणतेही नियम पाळलेले नाहीत. पूर्णतः नोकर भरती ही बेकायदेशीर आहे.
गोव्यातील सुशिक्षित युवकांवर अन्याय
एकूण 22 वेगवेगळय़ा कामांसाठी ही नोकरभरती करताना सरकारी नियमांना झुगारलेले आहे. मुळात सर्व पदांवर सत्तरी भागातील युवक-युवती पात्र ठरू शकत नाही. गोव्यातील इतर भागातही अनेक सुरक्षित मुले आहेत त्यांचाही विचार झाला पाहिजे. आपण एकूणच या घटनेचा अभ्यास केला असता राज्य नोकर भरती आयोगातर्फे देखील मुलाखती घेण्यात आलेल्या नाहीत. शिवाय एकूण 22 वेगवेगळे विभाग असले तरी सर्वांसाठी एकाच तऱहेची प्रश्नपत्रिका काढण्यात आली.
शैलेंद्र वेलिंगकरांच्या याचिकेवर 19 रोजी सुनावणी
गोमेकॉ प्रशासनाने कर्मचारी भरतीवेळी अंधाधुंदी केलेली आहे. गोवा रोजगार कायद्याची तत्वे पायदळी तुडविली आहेत. त्यामुळे संपूर्ण गोमेकॉच्या या 1294 जागांसाठी जी काही भरती झालेली आहे ती पूर्णतः बेकायदेशीर ठरवावी आणि रद्द करण्यात यावी, अशी याचिका शैलेंद्र वेलिंगकर यांनी दाखल केली आहे. उच्च न्यायालयाने यावर सुनावणी घेतली आणि आता पुढील सुनावणी दि. 19 सप्टेंबर रोजी ठेवली आहे.