नदिया बलात्कार प्रकरणी ममता बॅनर्जींना ‘घरचा आहेर’
कोलकाता / वृत्तसंस्था
पश्चिम बंगालमधील नादिया येथील अल्पवयीन युवतीवर तृणमूल काँगेसच्या कार्यकर्त्याने केलेला बलात्कार आणि त्यात तिच्या झालेल्या मृत्यूचे प्रकरण गाजत असताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना त्यांच्याच खासदाराकडून घरचा आहेर मिळाला आहे. राज्याचे मुख्यमंत्रीपद एका महिलेकडे असताना अशा घटना घडतात हे शरमेची बाब आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया तृणमूल काँगेसचे खासदार सौगत रॉय यांनी व्यक्त केली. महिला मुख्यमंत्री असताना महिलांविरोधात एक गुन्हा घडला तरी तो सहन केला जाता कामा नये, असेही त्यांनी सुनावले आहे.
या बलात्कार प्रकरणानंतर ममता बॅनर्जी यांनी केलेले वक्तव्य आगीत तेल ओतणारे आणि वादग्रस्त ठरले होते. हे बलात्कार प्रकरण आहे की प्रेमप्रकरणातून त्या अल्पवयीन मुलीला दिवस गेले हे कसे कळणार, अशी प्रतिक्रिया ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केली होती. ती चांगलीच वादग्रस्त ठरुन त्यांच्यावर सोशल मिडियामधून त्यांची खरडपट्टी काढण्यात आली होती.
आता त्यांचेच खासदार सौगत रॉय यांनी या प्रकरणात राज्य सरकारच्या कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या क्षमतेवरच प्रश्नचिन्ह उमटविल्याने तृणमूल काँग्रेसची कोंडी झाली. हे रॉय यांचे व्यक्तीगत मत आहे, अशी सारवासारवी करण्याचा प्रयत्न झाला. विशेषतः ममता बॅनर्जींनी या साऱयाच प्रकरणावर पांघरुण घालण्याच्या केलेला प्रयत्न आणि खासदार सौगत रॉय यांची प्रतिक्रिया यावरुन तृणमूल काँगेसमधील मतभेद चव्हाटय़ावर आल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
सीबीआयकडे चौकशी द्या नादिया बलात्कार प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे द्यावी, अशी मागणी पश्चिम बंगाल भाजपने केली आहे. मुख्यमंत्री दर्शवितात त्याप्रमाणे हे प्रेमप्रकरण नाही. हा सामुहिक बलात्काराचा गंभीर गुन्हा आहे. बलात्कारानंतर ही अल्पवयीन मुलगी गर्भवती झाली. तिचा सक्तीने बेकायदेशीर गर्भपात करण्यात आला असाही आरोप आहे. या गर्भपातामुळे तिचा मृत्यू झाल्याचेही बोलले जाते. त्यामुळे हे प्रकरण सीबीआयकडे द्यावे, अशी मागणी राज्य भाजपने केली आहे.