Tarun Bharat

लॉकअप डेथ प्रकरणाचा तपास कुठपर्यंत?

महिना होत आल्याने जनतेत संशयाचे वातावरण : सीआयडीचे अधिकारी पुन्हा बेळगावला येणार

प्रतिनिधी /बेळगाव

शंभर ग्रॅम गांजा प्रकरणाच्या चौकशीसाठी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात आणलेल्या बेल्लद बागेवाडी, ता. हुक्केरी येथील एका रहिवाशाचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला. या घटनेला एक महिना होत आला तरी अद्याप अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. सध्या या प्रकरणाचा तपास सीआयडीचे अधिकारी करीत असले तरी मृतांच्या कुटुंबीयांना न्याय मिळेल, याची शक्मयता धूसर झाली आहे.

बसनगौडा पाटील (वय 45) रा. बेल्लद बागेवाडी याला 11 नोव्हेंबर रोजी दुपारी बेळगाव ग्रामीण पोलिसांनी बेल्लद बागेवाडी येथे चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. बेळगावला येताना काकतीजवळ त्याला अस्वस्थपणा जाणवला. म्हणून खासगी डॉक्टरांकडे उपचार करून पोलीस स्थानकात नेण्यात आले. चौकशी सुरू असताना पुन्हा त्याला उलट्या सुरू झाल्या. सिव्हिल हॉस्पिटलला हलविल्यानंतर काही वेळात त्याचा मृत्यू झाला, असे पोलीस अधिकाऱ्यांनी या घटनेसंबंधी सुऊवातीला माहिती दिली होती.

बसनगौडाच्या कुटुंबीयांनी लॉकअप डेथचा हा प्रकार असल्याचा आरोप करीत चौकशीची मागणी केली होती. नियमानुसार लॉकअप डेथची प्रकरणे तपासासाठी सीआयडीकडे सोपविली जातात. या घटनेनंतर दोन दिवसांत बेंगळूर येथील सीआयडीचे अधिकारी चौकशीसाठी बेळगावात दाखल झाले. आठ दिवस सतत यासंबंधी माहिती जमवून ते बेंगळूरला रवाना झाले आहेत.

उपलब्ध माहितीनुसार सीआयडीचे अधिकारी या आठवड्यात पुन्हा बेळगावला येणार आहेत. शवचिकित्सा अहवालाची त्यांना प्रतीक्षा आहे. या प्रकरणात आपण अडकू नये, यासाठी पुरेपूर काळजी घेणाऱ्या बेळगाव ग्रामीणच्या अधिकाऱ्यांनी लॉकअप डेथ प्रकरण दडपण्यासाठी सर्व ती खबरदारी घेतली आहे. त्यामुळे सीआयडी चौकशीत तरी बसनगौडाच्या कुटुंबीयांना न्याय मिळणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

प्रकरण दडपल्याची चर्चा

गेल्या एक-दोन महिन्यांत पोलीस अधिकारी वेगवेगळ्या कारणांनी वादाच्या भोवऱ्यात अडकत आहेत. लॉकअप डेथ प्रकरण दडपण्याची तयारी झाली म्हणेपर्यंत अन्य प्रकरणे सामोरी आली आहेत. गरजेनुसार शासकीय यंत्रणेचा वापर केला जात असून आपण अडचणीत येऊ, याची शक्मयता वाटली तर सीसीटीव्ही फुटेज गायब करणे, चौकशी अधिकाऱ्यांची बडदास्त ठेवणे, आदी प्रकार अवलंबतात. ‘आई आम्हाला वाचव’ म्हणत देवीला साकडेही घालण्यात आले आहे. या प्रकरणात अडकलेले अधिकारी व पोलीस सध्या रिलॅक्स मूडमध्ये असून त्यामुळेच हे प्रकरण दडपल्याची चर्चा सुरू झाली आहे. 

Related Stories

जमा-खर्च घेणारे निवडणूक अधिकारीच गायब

Amit Kulkarni

आंबेवाडीत भरदिवसा गोळीबार

Tousif Mujawar

सामान्य आजार, नागरिक बेजार

Amit Kulkarni

देवदर्शनांवर सध्या प्रतिबंध

tarunbharat

सुवर्णसौधमध्ये माहिती आयोग कार्यालयाचा शुभारंभ

Patil_p

उद्यानातील अंधारामुळे गैरप्रकारांना ऊत

Amit Kulkarni