आपले संगणक किंवा मोबाईल हॅक होणे आणि त्यांच्यात साठवलेली माहिती करप्ट होणे किंवा चोरीला जाणे या बाबी नवीन नाहीत. कोणी तरी खोडसाळपणाने किंवा हेतूपुरस्सर केलेल्या सायबर हल्ल्यात आपल्या इलेक्ट्रॉनिक गॅजेट्समधील माहिती हरविणे किंवा विद्रुप होण्याचा अनुभव अनेकदा येत असतोच. पण स्मार्ट वॉचवरतीही असा सायबर हल्ला होऊ शकतो, ही बाब नव्यानेच उघडकीस आली आहे. वास्तविक स्मार्ट वॉचमध्ये कोणी महत्त्वाची माहिती साठवून ठेवत नाहीत. स्मार्ट वॉचमध्ये प्रामुख्याने आपल्या प्रकृतीसंदर्भातील माहिती साठविलेली असते.
मात्र, या माहितीवरही सायबर हल्ला चढवून ती हस्तगत करण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. स्मार्ट वॉच हे मोबाईल आणि ऍप्सबरोबर संलग्न केलेली असतात. त्यांच्यामध्ये केवळ आपल्या शरीराच्या हालचाली, हृदयाचे ठोके, आपल्या चालण्याचा वेग, आपली ऑक्सिजन पातळी अशी आर्थिक व्यवहारांशी संबंधित नसलेली माहिती साठविलेली असते. आपल्या प्रकृतीविषयीची माहिती आपल्या मोबाईलमधून मुख्य सर्व्हरपर्यंत सातत्याने जात असते. अशी माहिती चोरण्याचे प्रकारही घडत आहेत. स्मार्ट वॉचमध्ये मोबाईल किंवा संगणकाप्रमाणे विशेष सिक्मयुरिटी फिचर्स असत नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर सायबर हल्ला करणे तुलनेने सोपे असते. त्यामुळे आपल्या स्मार्ट वॉचचीही काळजी घेतली जावी, अशी सूचना तज्ञांनी केली आहे. सुरक्षेसाठी त्यांनी काही उपायही सुचविले आहेत.
स्मार्ट वॉचमधील माहितीचा कोणाला काय उपयोग होतो, असा प्रश्न पडू शकतो. स्मार्ट वॉचचा जीपीएस आपल्या विविध हालचालींची माहिती नोंद करतो. त्यात आपण कुठून, केव्हा आणि कोठे चाललो आहोत, किती वाजता आपण घरातून निघालो इत्यादी माहिती नोंद केली जाते. या माहितीचा उपयोग आपल्यावरती लक्ष ठेवण्यासाठी केला जातो. त्यामुळे ही माहिती आपल्या हालचाली गुप्तपणे टिपणाऱया माणसांसाठीही उपयुक्त असते. त्यामुळे ती चोरली जाते.
स्मार्ट वॉचमधील माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी प्रथम मोबाईलची सुरक्षा जपली पाहिजे. सार्वजनिक वायफाय इंटरनेटचा वापर टाळला पाहिजे. संवेदनशील ठिकाणी जाताना ट्रकिंग बंद ठेवावे. ट्रकिंग बंद ठेवण्याची सोय जवळपास सर्व स्मार्ट वॉचमध्ये असते. ज्यावेळी स्मार्ट वॉच उपयोगात नसते, तेव्हा ते बंद ठेवावे. किंवा मोबाईलचे ब्ल्यू टूथ कनेक्शन बंद करावे. तसे केल्याने मोबाईल डिस्कनेक्ट होतो. स्मार्ट वॉचचे सॉफ्टवेअर आधुनिक राखावे. आवश्यकता नसताना लोकेशन सर्व्हिस बंद ठेवावी. स्मार्ट वॉचमध्ये बँकेचा पासवर्ड, आपले छायाचित्र किंवा अन्य खासगी माहिती साठवू नये. स्मार्ट वॉचमधील माहिती वेळोवेळी डिलिट करावी. हॅकर्स रात्री प्रामुख्याने सक्रिय असतात. त्यामुळे रात्रीच्यावेळी शक्मय असल्यास स्मार्ट वॉच मोबाईलपासून डिस्कनेक्ट करून ठेवावे. अशा सूचना तज्ञांनी दिल्या आहेत.