जपान ओपन : सिंगापूरच्या लोह कीनवर मात, किदाम्बी श्रीकांतचे आव्हान समाप्त
वृत्तसंस्था /ओसाका
भारताच्या एचएस प्रणॉयने जपान ओपन सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविताना माजी वर्ल्ड चॅम्पियन सिंगापूरच्या लोह कीन यू याला पराभवाचा धक्का दिला तर किदाम्बी श्रीकांतचे आव्हान उपउपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले.
माजी आठवा मानांकित प्रणॉयने गेल्या आठवडय़ात झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती. त्याने सिंगापूरच्या लोह कीनचा 22-20, 21-19 असा चुरशीच्या लढतीत पराभव केला. 44 मिनिटे ही झुंज रंगली होती. सातव्या स्थानावर असणाऱया लोह कीनवर प्रणॉयने मिळविलेला हा गेल्या चार सामन्यांतील तिसरा विजय आहे. 30 वर्षीय प्रणॉयची उपांत्यपूर्व लढत चिनी तैपेईच्या चौ तिएन चेनशी होणार आहे. चेनने गेल्या आठवडय़ात वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कांस्य मिळविले होते. प्रणॉय हा जागतिक क्रमवारीत 18 व्या स्थानावर असून प्रणॉयने मागील दोन लढतीत चेनवर विजय मिळविलेला आहे. मात्र एकंदर लढतीत प्रणॉय 3-4 असा पिछाडीवर आहे.
किदाम्बी श्रीकांतने आधीच्या फेरीत जागतिक पाचव्या मानांकित मलेशियाच्या ली झी जियाला पराभवाचा धक्का दिला होता. पण हा जोम त्याला जपानच्या जागतिक 17 व्या मानांकित कांता त्सुनेयामाविरुद्ध कायम राखता आला नाही.
त्सुनेयामाकडून तो 10-21, 16-21 असे पराभूत झाला. यापूर्वी 2019 कोरिया ओपनमध्ये फक्त एकदाच त्यांची गाठ पडली होती आणि त्यावेळीही त्सुनेयामाने विजय मिळविला होता.