वृत्तसंस्था/ ओसाका
भारतीय बॅडमिंटनपटू एचएस प्रणॉयने येथे सुरू असलेल्या जपान ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला. पहिल्या फेरीच्या लढतीत त्याचा प्रतिस्पर्धी एन्ग का लाँग अँगसने दुखापतीमुळे सामन्यातून माघार घेतल्याने त्याला पुढे चाल मिळाली.
बिगरमानांकित प्रणॉय पहिल्या गेममध्ये 11-10 असा किंचित आघाडीवर होता. पण सातच मिनिटानंतर हाँगकाँगच्या अँगसने सामना सोडून देण्याचा निर्णय घेतला. जागतिक क्रमवारीत 18 व्या स्थानावर असणाऱया प्रणॉयची पुढील लढत माजी वर्ल्ड चॅम्पियन सिंगापूरच्या लोह कीन यू याच्याशी होणार आहे. गेल्या आठवडय़ात टोकियोत झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये प्रणॉय फॉर्ममध्ये असल्याचे दिसून आले होते. त्याने दोन वेळचा वर्ल्ड चॅम्पियन केन्टो मोमोटा व आपल्याच देशाच्या लक्ष्य सेन यांना पराभवाचे धक्के दिले होते. मात्र त्या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत चीनच्या झाओ जुनपेंगने त्याचे आव्हान संपुष्टात आणले होते.