कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन : विविध घोषणांनी परिसर दणाणला
प्रतिनिधी /बेळगाव
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली सोमवार दि. 26 रोजी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यासाठी बेळगावमधून शेकडो कार्यकर्ते सकाळी दुचाकी-चारचाकी वाहनांनी कोल्हापूरला रवाना झाले. तत्पूर्वी शहापूर येथील छत्रपती शिवाजी उद्यानात शिवरायांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले.
उद्योजक रमेश पावले यांच्या हस्ते शिवमूर्तीचे पूजन करण्यात आले. जय भवानी, जय शिवाजी, बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे या घोषणांनी शिवाजी उद्यान परिसर दणाणून गेला होता. यावेळी मध्यवर्ती म. ए. समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, नगरसेवक रवी साळुंके, नेताजी जाधव, सुनील बोकडे, एम. वाय. पाटील, बाबू कोले, विनोद आंबेवाडीकर, शिवानी पाटील, साधना पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने म. ए. समितीचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
शहरासह गावागावातून मराठी भाषिक दुचाकी, चारचाकी व मोठ्या वाहनांनी कोगनोळीपर्यंत पोहोचले. भगवे झेंडे, भगवे फेटे, भगव्या टोप्या घालून मराठी अस्मितेचे दर्शन घडवीत हे सर्वजण कोगनोळी टोल नाक्यापर्यंत पोहोचले. तेथून भव्य मोर्चा काढत सर्वांनी कोल्हापूर गाठले.
पोलिसांचा कडक बंदोबस्त
सीमावासीय शिवाजी उद्यान येथे कोल्हापुरला जाण्यासाठी जमले होते. परंतु कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शिवाजी उद्यान परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सध्या बेळगावमध्ये अधिवेशन सुरू असल्याने कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.