वृत्तसंस्था/ ओक्साका
प्रशांत महासागरातात निर्माण झालेले चालू वर्षातील पहिले चक्रीवादळ ‘अगाथा’ने दक्षिण मेक्सिकोत मोठे नुकसान घडवून आणले आहे. चक्रीवादळामुळे तेथे पूर आला असून अनेक भागांमध्ये भूस्खलन घडले आहे. चक्रीवादळामुळे कमीत कमी 10 लोकांचा मृत्यू झाला असून 20 जण बेपत्ता झाले आहेत. हुआतुल्कोच्या रिझॉर्टनजीक 3 मुलं बेपत्ता झाली आहेत.
अगाथा चक्रीवादळाच्या प्रभावामुळे 165 किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने वारे वाहिले आहेत अशी माहिती ओक्साका शहराच्या गव्हर्नरांनी दिली आहे. तर युएस नॅशनल हरिकेन सेंटरनुसार मेक्सिकोमध्ये 73 वर्षांनी अशाप्रकारचे भयानक वादळ धडकले आहे. मेक्सिकोत अनेक ठिकाणी बचावपथके तैनात करण्यात आली असून बेपत्ता लोकांचा शोध घेतला जात आहे.
दुसऱया शेणीचे चक्रीवादळ मेक्सिकोच्या दक्षिण हिस्स्याला धडकले आहे. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे अतिवृष्टी होत पूरसंकट निर्माण झाले आहे. या पूरामुळे अनेक घरे वाहून गेली आहेत. पर्वतीय क्षेत्रांमध्ये वास्तव्य करणाऱया लोकांना या चक्रीवादळाचा सर्वात मोठा फटका बसला आहे.
पूर आणि भूस्खलनामुळे अनेकांना जीव गमवावा लागला असल्याचे ओक्साकाचे गव्हर्नर एलेजांद्रो मूरात यांनी म्हटले आहे. चक्रीवादळादरम्यान अनेक ठिकाणचा वीजपुरवठा खंडित करण्याचे पाऊल प्रशासनाने उचलले आहे. अगाथा हे प्रशांत महासागर क्षेत्रातील यंदाचे पहिलेच चक्रीवादळ आहे.