हैदराबाद येथून गोव्यात परतताना काळाचा घाला
पेडणे / प्रतिनिधी
हैद्राबाद येथून गोव्यात परतताना बिजापूर कर्नाटक येथे अर्टिका गाडीच्या झालेल्या भीषण अपघातात बाजारपेठ-पेडणे येथील वर्षा विशाल बोंदे (वय 26) आणि पती विशाल संघराज बोंदे (वय 31) यांचा मृत्यू झाला. या ह्रदयद्रावक घटनेने पेडणे बाजारपेठेवर शोककळा पसरली आहे.
मोपा विमानतळावर कार्गो स्कॅनर म्हणून निवड झालेली दिशा कांबळी ही हैद्राबाद येथे ट्रनिंगसाठी गेली आहे. तिची विचारपूस करण्यासाठी मंगळवारी अर्टिका चारचाकी जीए – 11 – ए – 3738 या गाडीने दिशाची आई, भावोजी विशाल संघराज बोंद्रे, बहीण वर्षा विशाल बोंद्रे, दुसरी बहीण, आणि एक शेजारी महिला व तिचा लहान मुलगा तसेच मृत पावलेल्यांची दहा वर्षाची मुलगी आणि गाडीचा चालक हे सर्वजण हैद्राबाद येथे गेले होते.
हैद्राबादहून परतताना काळाचा घाला
वरील सर्व मंडळी दिशा कांबळी हिला भेटून परत गोव्यात येण्यासाठी निघाली होती. गुरुवारी बिजापूर येथे ते पोचले असता गाडीवरील चालकाचा ताबा गेल्याने गाडी रस्ता सोडून बाहेर गेल्याने पलटी खाल्याने झालेल्या या भीषण अपघातात वर्षा विशाल बोंदे व विशाल संगराज बोंदे ही दोघी नवरा बायको यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
सुदैवाने दोन लहान मुले बचावली
या गाडीत मृत पावलेल्या वर्षा व विशाल यांची 11 वषीय मुलगी व शेजारी महिलेचा लहान मुलगा होता. माञ ती दोघेही सुखरुप बचावली. वर्षा यांची आई हिच्या कंबरेला गंभीर दुखापत झाली आहे. इतरानांही किरकोळ दुखापती झाल्या आहेत, असे मयत वर्षा यांची बहीण साहिली कांबळी हिने सांगितले. भागेवाडी येथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
हा अपघात वसंत भागेवाडी बिजापूर पोलीस स्थानकाच्या हद्दीत झाला असून पेडणे पोलीस स्थानकाचे उपअधिक्षक सिद्धांत शिरोडकर यांनी बिजापूर पोलिसांकडे संपर्क साधला आहे.