प्रतिनिधी /काणकोण
मोखर्ड, काणकोण येथे एका भाडय़ाच्या खोलीत राहणाऱया मूळ उत्तर प्रदेशातील शहजाद खान या व्यक्तीला आपली पत्नी रिमा चौधरी हिचा खून करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल काणकोणच्या पोलिसांनी अटक केली असून पुढील चौकशीसाठी त्याला आठ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश काणकोणच्या न्यायालयाने दिला आहे. काणकोणच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपीने आपली पत्नी रिमा हिच्या खांदा, गळय़ावर आणि पाठीवर चाकूने वार केले असून सध्या तिला बांबोळी इस्पितळात उपचारांसाठी ठेवण्यात आले आहे. रिमा चौधरीला 4 वर्षांचा मुलगा असून 6 वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झाले होते. काणकोणचे पोलीस निरीक्षक प्रवीण गावस यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रामचंद्र नाईक पुढील तपास करत आहेत.