प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव-हैदराबाद विमानफेरी तांत्रिक कारणाने मागील महिनाभरापासून बंद होती. यामुळे हैदराबादला ये-जा करणाऱया प्रवाशांची गैरसोय होत होती. त्यामुळे स्पाईस जेट कंपनीने पुन्हा सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच यासंबंधीची तारीख जाहीर करण्यात येणार आहे.
बेळगावमधून हैदराबाद येथे येणाऱया व जाणाऱया प्रवाशांची संख्या अधिक आहे. ज्यावेळी बेळगाव-दिल्ली विमानफेरी सुरू नव्हती, तेव्हा प्रवासी हैदराबादमार्गे दिल्लीला पोहोचत होते. त्यामुळे हैदराबाद विमानफेरी महत्त्वाची होती. बेळगावमधून दररोज दोन विमाने हैदराबादला जातात. परंतु काही तांत्रिक कारणाने मागील महिनाभरापासून स्पाईस जेट कंपनीने सेवा थांबविली होती. त्यामुळे प्रवाशांना इंडिगोच्या एकमेव विमानावर अवलंबून रहावे लागत होते.
प्रवाशांची गैरसोय होत असल्याने ही विमानफेरी पूर्ववत करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे विमानतळ प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. यामुळे बेळगाव-हैदराबाद-बेळगाव असा प्रवास करणाऱयांची सोय होणार आहे. बेळगाव विमानतळाचे संचालक राजेशकुमार मौर्य यांनी लवकरच विमानफेरी सुरू होत असल्याची माहिती ‘तरुण भारत’शी बोलताना दिली.