Tarun Bharat

ढोंगी संन्यासी

Advertisements

अध्याय अठरावा

भगवंत म्हणाले, गुरुकृपेने ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होते. गुरु अचळ, निर्मळ, अविनाश, परेहून पलीकडचा परमेश्वर, परब्रह्म व ईश्वर आहे असाच दृढतर विश्वास धरावा. त्या दृढतर विश्वासाच्या सवयीने गुरुचरणाच्या ठिकाणी अपूर्व आवड उत्पन्न होऊन भजनाला नित्य नवी व अधिकाधिकच गोडी चढते. अशी भजनाची आवड उत्पन्न झाली म्हणजे अंतःकरणामध्ये अतिशय श्रद्धा उचंबळून येते. गुरूच्या आज्ञेची एक काडीसुद्धा तो ओलांडीत नाही आणि सारा आळस झाडून टाकतो. गुरूच्या ठिकाणी अतिशय श्रद्धा बसते. तो परब्रह्मदृष्टीनेच गुरूला पहात असतो.

 नित्य व निर्विकल्प असे जे समाधिसुख म्हणतात, ते माझ्या गुरूच्या चरणाचे तीर्थ होय. इतका तो दृढभावार्थी होतो. गुरूला अशा प्रकारे ब्रह्मस्वरूपाने पाहिले म्हणजे शिष्यालाही ब्रह्मस्वरूपाचीच पुष्टी प्राप्त होते. तो सारी सृष्टिच ब्रह्मरूप पाहू लागतो आणि आत्मैक्मयानेच गुरुचरणाला मिठी घालतो. अशा प्रकारे ब्रह्मस्वरूपाशी ऐक्मय झाले तरी, गुरूची सेवा करावीच लागते. हे झाले सदवर्तनी साधकाचे लक्षण पण काही लोक दांभिक असतात केवळ संन्यास घेतल्याचे नाटक करतात. ते कुणालाच जुमानत नाहीत. मस्तकाचे मुंडण करून स्वतःला मोठा संन्यासी म्हणवतात. भगवंतांना अशी मंडळी अजिबात आवडत नाहीत. त्यामुळे अशा संन्यास घेतल्याचे नाटक करत असलेल्या भोंदूना ब्रह्मस्वरूपाचा साक्षात्कार करून होत नाही. त्यांचा स्वतः श्रीकृष्ण अतिशय धिक्कार करून त्यांना दूषणे देतात.

 ते म्हणतात, ज्याने पाच इंद्रिये आणि मन या सहांवर विजय मिळविला नाही, ज्याचे इंद्रियरुपी घोडे आणि बुद्धीरूपी सारथी हे दोघेही बिघडलेले आहेत, तसेच ज्याच्या हृदयात ज्ञान व वैराग्य नाही, तो जर त्रिदंडी संन्याशाचा वेष धारण करून आपले पोट भरत असेल, तर तो संन्यासधर्माचा नाशच करीत आहे, असे समजावे.

 शिवाय तो देवांना, स्वतःला आणि आपल्या हृदयात असलेल्या मला फसविण्याचा प्रयत्न करीत असतो, त्याच्या वासना नष्ट झालेल्या नसतात म्हणून इहलोक आणि परलोक अशा दोन्ही लोकांना तो गमावून बसतो. काही लोक अंगांत वैराग्य न बाणता, विषयाची विरक्ती न येता, देखोवेखीने म्हणजे दुसऱयाचे पाहून केवळ अन्नासाठी संन्यास घेतात! संन्यास घेण्याच्या आधी अंतःकरणात जे वैराग्य झालेले होते, तेही संन्यास घेतल्यानंतर लगेच निघून जाते ! पाच ज्ञानेंद्रिये आणि सहावे मन, हेच त्याचे सहा शत्रु होतात. त्यांचे निर्दालन केल्याशिवाय संन्यास घेणे ही केवळ विटंबना होय.

 वैराग्याच्या अभावामुळे मन लोभीष्ट असते आणि बुद्धी विषयलंपट होते. ज्ञान नाही, ध्यान नाही, साधन नाही. उदरभरणासाठी दंड मात्र हातात घेतलेला ! उपरती कधी व्हावयाची नाही. श्रवणमननही कधी करावयाचे नाही. आदराने कधी साधनही करावयाचे नाही. अशाला कधीच ब्रह्मज्ञान होणार नाही. त्याचा संन्यास व्यर्थ, त्याचा दंड व्यर्थ, त्याचे मुंडण व्यर्थ, त्याची भगवी वस्त्रे व्यर्थ. ते केवळ नटाचे सोंग होय. संन्यास घेतल्यानंतर काम उचंबळतो, क्रोधाची लोभाची आगटी धुमसू लागते आणि मनामध्ये चौपट अभिमान उत्पन्न होतो.

 अधिकाधिक आसक्ती करावयाची, नेहमी गावकुटाळक्मया करायच्या, मोठेपणाच्या गोष्टी सांगायच्या आणि दंड व कौपीन ही केवळ दंभार्थ वापरावयाची ! दंड ग्रहण करण्याला असा मनुष्य निखालस अनधिकारी होय. त्याने संन्यासाच्या निमित्ताने आपली नागवण करून घेतली म्हणून समजावे. त्याने यज्ञाचे अधिकारी जे देव त्यांना टाळा दिला, स्वधाचे अधिकारी जे पितृगण त्यांना धाब्यावर बसविले, ऋषि व भूतगण यांनाही फसविले. कारण, त्याच्याकडून बलिदान कसलेच होत नाहीं ! जीवरूपाने मी परमात्मा स्वतः हृदयामध्ये असणारा, त्या मलाही तो ठकवितो. त्यामुळे जीवाच्या उद्धारासाठी जे संन्यासग्रहण करावयाचे तेच दृढतर बंधनाला मात्र कारणीभूत होते. असे का होत असेल ? संन्यासग्रहण हेच दृढ बंधनाला हेतु होण्याचे कारण काय ? याविषयीचे निरूपण श्रीकृष्ण पुढे सांगतील. क्रमशः

Related Stories

तामिळनाडूत कमळ फुलणार

Patil_p

नेतृत्वबदल की चालढकल?

Amit Kulkarni

सावधान : कोरोनाचा यु टर्न

Omkar B

कोकणात शिंदे गटाला बळ!

Patil_p

रामकथा

Patil_p

वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा!

Patil_p
error: Content is protected !!