2022 ची उत्कृष्ठ कार म्हणून गणना
वृत्तसंस्था/ गुरुग्राम
ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपनी हय़ुंडाई आपली नवी ‘आयोनिक 5’ ही जागतिक स्तरावर गणलेली कार भारतात दुसऱया सहामाहीत लाँच करणार असल्याचे सांगितले जाते.
सदरची नवी इलेक्ट्रिक कार वर्षाच्या दुसऱया सहामाहीत भारतात लाँच केली जाणार असून यायोगे कंपनी बॅटरी इलेक्ट्रिक व्हेईकल्सचा स्वीकार करण्यासही सुरूवात करणार आहे. ही 2022 ची जागतिक स्तरावरची उत्तम कार म्हणून गणली गेली असून इलेक्ट्रिक ग्लोबल मॉडय़ूलर प्लॅटफॉर्मवर ही गाडी सादर केली जाणार आहे. पर्यावरणमैत्रीयुक्त (इकोप्रेंडली) साहित्याचा वापर गाडीच्या निर्मितीत करण्यात आला आहे.
हय़ुंडाई मोटर इंडिया लिमिटेडचे सीईओ व व्यवस्थापकीय संचालक उन्सु किम यांनी सांगितले, की हय़ुंडाई आता आपले लक्ष इलेक्ट्रिक कार्सवर केंद्रीत करत आहे. शाश्वत भविष्याच्या दृष्टीने इलेक्ट्रिक मोटारींना सादर करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असून 2022 सालासाठीचा उत्कृष्ठ कारचा पुरस्कार आमच्या ‘आयोनिक 5’ ला मिळाला याचा खूप आनंद झाल्याचे ते म्हणाले. बॅटरीशीसंबंधीत इलेक्ट्रिक वाहनांप्रती आम्हाला अधिक विस्तार करायचा असल्याचे ते म्हणाले.