Tarun Bharat

लोकांचा विश्वासघात करण्याची ताकद माझ्यात नाही

केपेचे आमदार एल्टन डिकॉस्ता यांचे उद्गार : मी त्याच मार्गावरून गेल्यास फरक राहिला नसता

वार्ताहर /केपे

केपे मतदारसंघातील काही लोकांना मी भाजपमध्ये गेलेले हवे होते व काहींना नको होते. पण मला लोकांनी काँग्रेसचा उमेदवार म्हणून निवडून आणलेले आहे. त्यामुळे लोकांचा विश्वासघात करण्याची ताकद माझ्याकडे नाही. तसेच देवासमोर घेतलेली शपथ हे सर्व चित्र माझ्या डोळय़ांसमोर येत होते. यापूर्वी केपे मतदारसंघातील लोकांचा विश्वासघात झालेला आहे. मी पण त्याच मार्गावर गेलो असतो, तर माझ्यात व पूर्वीच्या आमदारांमध्ये कोणताही फरक राहिला नसता, असे केपे मतदारसंघाचे आमदार एल्टन डिकॉस्ता यांनी सांगितले.

आमदार डिकॉस्ता मोरपिर्ला येथे केपे येथील कृषी विभागाने शेतकऱयांसाठी  आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सरपंच अश्विनी गावकर, उपसरपंच प्रकाश वेळीप, पंच नागेश वेळीप, नीतेश गावकर, केपे कृषी विभागाचे अधिकारी संदेश राऊत देसाई, गाल्गिनी मिरांडा, ‘आत्मा’चे अधिकारी रघुनाथ मोरजकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

भारत हा कृषिप्रधान देश असून शेतकऱयांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना आपण मदत केली पाहिजे. केपे मतदारसंघातील प्रत्येक शेतकऱयाला मी मदत करेन तसेच त्यांच्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करून सरकारच्या प्रत्येक योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांना सहकार्य करेन. लोकांची कामे व्यवस्थितपणे व्हावीत यासाठी माझी पाच कार्यालये आहेत. केपेतील जनतेने त्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार डिकॉस्ता यांनी केले. मी विरोधात राहून सुद्धा तुमची कामे करून दाखवणार, असे ते पुढे म्हणाले.

मी आमदार नसताना मोरपिर्ला येथील विद्यार्थ्यांसाठी मोफत वायफाय सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम केलेले आहे. मोरपिर्ला गावातील नेटवर्कची समस्या दूर करण्यासाठी माझा प्रयत्न चालू आहे. मी आमदार होताच केपेतील अनेक कामे मार्गी लागलेली आहेत. केपेतील लोकांच्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा माझा प्रयत्न असेल, असे आमदार डिकॉस्ता यांनी स्पष्ट केले.

उपसरपंच प्रकाश वेळीप म्हणाले की, आमदार डिकॉस्ता यांचे सहकार्य आम्हाला लाभत असून यापुढे मोरपिर्ला पंचायत क्षेत्राचा विकास करण्यासाठी आम्हाला सतत त्यांनी सहकार्य करावे. कृषी अधिकारी संदेश राऊत देसाई म्हणाले की, आम्ही शेतकऱयांना नेहमीच सहकार्य करून त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी मदत करतो.

Related Stories

कुडचडे येथे डॉ. उदय देसाई यांच्या बालचिकित्सालयाचे उद्घाटन

Amit Kulkarni

साडेचार महिन्यांत 222 चोरीच्या घटना

Patil_p

पिळगाव पंचायतीचे राजकारण पंचायत पातळीवरच

Amit Kulkarni

फोंडय़ात संततदार पावसाचा जोरदार तडाखा

Omkar B

सीझेडएमपी जनसुनावणी रद्द करण्यात यावी ः अभिजीत प्रभुदेसाई

Amit Kulkarni

बारावीची परीक्षा रद्द करु नका

Omkar B