वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केरळमधील मल्लापूरम येथे 2022-23 च्या आय लीग फुटबॉल स्पर्धेला 12 नोव्हेंबरपासून प्रारंभ होणार असल्याची माहिती अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनच्या प्रवक्त्याने दिली.
या स्पर्धेतील सलामीचा सामना विद्यमान विजेता गोकुळम केरळ एफसी आणि गेल्यावर्षीच्या आय लीग हंगामातील उपविजेता मोहमेडन स्पोर्टींग एफसी संघात खेळविला जाणार आहे. गेल्या दोन फुटबॉल हंगामामध्ये सदर स्पर्धा कोरोना महामारीमुळे बायोबबल नियमा अंतर्गत खेळविली गेली होती. या स्पर्धेतील सामने त्यावेळी कोलकाता, कल्याणी आणि नेहाती या पश्चिम बंगालमधील शहरांमध्ये खेळविले गेले होते. पण यावेळी आय लीग फुटबॉल स्पर्धेतील सामने देशातील 13 विविध ठिकाणी आयोजित केले आहेत. गोकुळम केरळचा संघ 6 सामने मल्लापूरम येथे खेळणार असून उर्वरित 5 सामने कोझीकोडे येथे खेळणार आहे. यावेळी श्रीनगरच्या बक्षी स्टेडियमवर पहिल्यांदाच आय लीगचे सामने होणार आहेत.