पती आणि पत्नी यांच्यातील नाते जगातील सर्वात जवळचे मानले गेले आहे. वास्तविक पती-पत्नी होण्यापूर्वी ते एकमेकांचे नातेवाईक नसतात. तथापि, जगातील सर्व नाती या एका नात्यानेच निर्माण झालेली असतात. मात्र, पती-पत्नी हे नाते कितीही जवळचे असले तरी आपल्या सख्ख्या बहिणीशी विवाह करण्याची पद्धत जगातल्या कोणत्याही समाजामध्ये नाही. सख्ख्या बहिणीशी विवाह अनैतिक मानला गेला आहे. त्यामुळे तो नेहमीच त्याज्य मानण्यात आला आहे.
तथापि, अमेरिकेतील उटाह येथील एका वाईन यार्डमध्ये राहणारे टेज हिल आणि मार्सिला यांचा विवाह बारा वर्षांपूर्वी झाला. मार्सिला गर्भवती झाल्यानंतर दोघांनी आपल्या होऊ घातलेल्या अपत्याचे नाव शोधण्याचा प्रयत्न चालविला. यासाठी त्यांनी इंटरनेटवर शोध घेण्यास सुरुवात केली. दोघांपैकी कोणाच्या तरी पूर्वजाचे नाव आपल्या अपत्याला देण्याचा त्यांचा विचार होता. यासाठी त्यांनी त्यांच्या कुटुंबांचा इतिहास इंटरनेटवर धुंडाळण्यास प्रारंभ केला.
हा शोध घेताना त्यांना एका अत्यंत धक्कादायक अशा वस्तुस्थितीचा पत्ता लागला. दोघांच्याही तिसऱया पिढीतील पणजोबा आणि पणजी यांची नावे समान निघाली. ते पाहून त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. प्रथम त्यांना वेबसाईटवर काही तरी चूक झाली असेल असे वाटले. तथापि, नंतर त्यांनी त्यांच्या आईवडिलांची नावे पाहिली तर तीही समानच निघाली. पत्नीचे आजोबा आणि पतीची आजी ही चुलत भावंडे होती. हे समजताच मार्सिला यांनी आपले आजोबा चार्ल्स फिलिप यांना फोन केला. त्यावेळी त्यांच्यातील नात्याचा उलगडा झाला. नंतर त्यांना एकमेकांशी लग्न केल्याचा पश्चाताप होऊ लागला. आता त्यांचा घटस्फोट झाला असून मार्सिला या आपल्या माहेरी परत गेल्या आहेत. त्यांचे अपत्य एक मुलगी असून ती आता आठ वर्षांची आहे. घटस्फोट झालेला असूनही त्यांच्यातील संबंध मैत्रीचे आहेत. पण नकळत झालेल्या कृतीबद्दल त्यांना आजही अपराधी वाटत आहे.