मुंबई : महाराष्ट्राचे माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी शनिवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि एकनाथ शिंदे सरकार यांच्यामध्ये महाराष्ट्रातील प्रकल्प राज्याबाहेर जाण्यावरून वाद धुमसत असतानाच आदित्य ठाकरे यांनी सरकारवर आरोप केले.
आदित्य ठाकरे म्हणाले की, “सध्याच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा धोक्यात आली आहे. जर मी देवेंद्र फडमवीस यांच्या जागी असतो तर राजीनामा दिला असता.” असे बोलून आदित्य ठाकरे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधत आदित्य ठाकरे म्हणाले की, “मध्य प्रदेशचे शिवराज चौहान, ओडिशाचे नवीन पटनायक आणि राजस्थानचे अशोक गेहलोत यांसारखे अन्य राज्यांचे मुख्यमंत्री आंतरराज्यीय गुंतवणूक संबंध लक्षात घेऊन महाराष्ट्रात आले, पण एकनाथ शिंदे कुठेही गेले नाहीत. आम्ही दावोसहून 80,000 कोटीं रुपयांची गुंतवणूक आणली. जर महाविकास आघाडी सरकार आणि केंद्र सरकार काम करून महाराष्ट्रात गुंतवणूक आणू शकतात, तर शिंदे करकारचे इंजिन का बिघडले आहे?” असे ते म्हणाले.

