नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
युपीएससी परीक्षेत २०१६ साली टॉप केल्याने चर्चेत आलेल्या राजस्थानचे केडरचे आयएएस अधिकारी अधिकारी पती-पत्नी टीना डाबी आणि अतहर आमीर अखेर कायदेशीररित्या विभक्त झाले आहेत.घटस्फोटासाठी दोघांनी २० नोव्हेंबर २०२० रोजी परस्पर संमतीने जयपूरच्या कौटुंबीक न्यायालयात अर्ज केला होता. न्यायलयाने मंगळवारी दोघांचाही घटस्फोट मंजूर केलाय.
दिल्लीच्या टीना डाबी यांनी २०१६ साली केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळावला होता. तर जम्मू-काश्मीरचे रहिवासी अतहर आमीर यांनी याच परीक्षेत द्वितीय क्रमांक पटकावला होता. दोघेही २०१६ च्या बॅचचे राजस्थान केडरचे आयएएस अधिकारी आहेत. यातच आयएएस प्रशिक्षणादरम्यान दोघांमध्ये मैत्री झाली आणि अखेर एप्रिल २०१८ साली त्यांनी लग्न केलं. त्यावेळी दोघांच्या लग्नाची अधिक चर्चा झाली होती. टीना आणि अतहरच्या लग्नाला तत्कालीन लोकसभा स्पीकर सुमित्रा महाजन, उपराष्ट्रपती वंकैय्या नायडूंसह अनेक नेत्यांनी हजेरी लावली होती. या लग्नावर अखिल भारतीय हिंदू महासभेने लव्ह-जिहाद म्हणत आक्षेप घेतला होता.
या दोघांचं बिनसल्याची चर्चा तेव्हा सुरू झाली जेव्हा टीनाने तिच्या आडनावातून खान हटवलं आणि अतहरने तिला सोशल मीडियावर अनफॉलो केलं. मात्र काही कारणास्तव त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण आणि गेल्यावर्षी नोव्हेंबर २०२० मध्ये त्यांनी विभक्त होण्याची निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी परस्पर संमतीने जयपूरच्या कौटुंबीक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला. सध्या टीना डाबी वित्त विभागात संयुक्त सचिव म्हणून कार्यरत आहेत. तर घटस्फोटाची याचिका दाखल होताच काही महिन्यांनी अतहर आमिर प्रतिनियुक्तीवर जम्मू-काश्मीला गेले.