वृत्तसंस्था/ काबुल
आयर्लंड विरुद्ध होणाऱया आगामी टी-20 मालिकेसाठी अफगाणच्या टी-20 संघामध्ये इब्राहिम झद्रन, हशमतुल्ला शाहिदी आणि नवीन उल हक यांचे पुनरागमन झाले आहे. त्याचप्रमाणे मुजीब उर रेहमान या मालिकेसाठी राखीव खेळाडू म्हणून राहिल.
आयर्लंडमध्ये अफगाण आणि आयर्लंड यांच्यात पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळविली जाणार आहे. मोहमद नबीकडे अफगाणचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. गेल्या जूनमध्ये झिंबाब्वे विरुद्ध झालेल्या मालिकेत फिरकी गोलंदाज कयास अहमद आणि मुजीब उर रेहमान यांना संधी मिळाली नव्हती. मात्र, आयर्लंड विरुद्धच्या मालिकेसाठी या दोघांना राखीव खेळाडू म्हणून जाहीर करण्यात आले आहे. मुजीब उर रेहमानसमोर सध्या व्हिसाची समस्या निर्माण झाली आहे. त्याला व्हिसा मिळाल्यानंतर प्रमुख खेळाडूमध्ये स्थान देण्यात येईल. झिंबाब्वेविरुद्ध टी-20 प्रकारात पदार्पण करणाऱया इसानुल्ला जेनतला या आगामी मालिकेसाठी वगळण्यात आले आहे.
या मालिकेसाठी निवडण्यात आलेल्या अफगाण संघाचे नेतृत्व मोहमद नबीकडे कायम राखण्यात आले आहे. सलामीचा फलंदाज इब्राहिम झद्रन तसेच उस्मान घनी यांची झिंबाब्वेविरुद्धच्या मालिकेतील कामगिरी दर्जेदार झाली होती. इब्राहिम झद्रन हा अफगाणचा भरवशाचा फलंदाज असून त्याने आपल्या फलंदाजीत सातत्य राखताना सात डावात 56.60 धावांच्या सरासरीने 283 धावा जमविल्या आहेत. अफगाण संघातील नवीन उल हक हा प्रमुख गोलंदाज म्हणून ओळखला जातो. अफगाणचा माजी कर्णधार गुलबदन नईबला पुन्हा वगळण्यात आले आहे. आयर्लंड आणि अफगाण यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेला 9 ऑगस्टपासून बेलफास्टमध्ये प्रारंभ होणार आहे.
अफगाण संघ- मोहमद नबी (कर्णधार), रेहमानुल्लाह गुरबाज, एच. झेजाई, इब्राहिम झद्रन, डी. रसुली, नजीबुल झेद्रान, हसमतुल्ला शाहिदी, अफसर झेजाई, करीम जेनत, अजमतुल्ला ओमरझाई, शरफुद्दीन अशरफ, रशीद खान, फजल हक फरुकी, फरीद अहमद मलिक, नवीन उल हक आणि नूर अहमद.