इचलकरंजी/प्रतिनिधी
राज्यातील 28 वी महानगरपालिका म्हणून आज इचलकरंजी शहराची घोषणा झाली. महापालिकेचे आयुक्त म्हणून निवड श्रेणी मुख्याधिकारी सु. वी. देशमुख यांची 29 जून 2022 पासून नियुक्ती केली आहे. याबाबत नगर विकास विभागाचे उपसचिव सतीश मोघे यांनी आदेश काढला आहे.
इचलकरंजी शहराची वाढती लोकसंख्या पाहता महानगरपालिका व्हावी यासाठी विद्यमान खासदार धैर्यशील माने प्रयत्नशील होते. याबाबत राज्य शासनाने हरकती मागवल्या होत्या या हरकती प्राप्त झाल्यानंतर महानगरपालिका होण्याचा मार्ग मोकळा होणार होता अखेर आज शासनाने याबाबतचा आदेश काढला असून आता राज्यातील 28 वी महापालिका म्हणून इचलकरंजी शहर निश्चित झाले आहे.
महापालिका होताना शहरालगत चा कोणता भाग समाविष्ट होणार याबाबतही उत्सुकता होती. मात्र शहराच्या मूळ हद्दीत एक इंचची वाढ न होता महापालिका झाली आहे. शासनाच्या आजच्या या निर्णयामुळे आता पुन्हा निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.