पुलवामा : दक्षिण काश्मीरच्या पुलवामा क्षेत्रात गुरुवारी दुपारी सुरक्षा दलांना रस्त्याच्या कडेला शोधमोहिमेच्या दरम्यान प्रेशर कुकर आयईडी सापडला आहे. सुरक्षा दलांनी त्वरित याची माहिती बॉम्बविरोधी पथकाला दिली. या पथकाने घटनास्थळी धाव घेत तो निष्क्रीय केला आहे.
दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्हय़ातील अरमुला लस्सीपोरा भागात रस्त्याच्या कडेला सैन्य, सीआरपीएफ आणि पुलवामा पोलिसांच्या संयुक्त शोधमोहिमेदरम्यान प्रेशर कुकर आयईडी मिळाला आहे. हा आयईडी निष्क्रीय करण्यात आल्याने मोठा घातपात रोखण्यास यश मिळाले आहे. या रस्त्यावरून ये-जा करणाऱया वाहनांची संख्या मोठी असते. स्थानिक पोलिसांनी आयईडी संबंधी गुन्हा नोंदवून परिसरात शोधमोहीम हाती घेतली आहे.