दुसऱया टप्प्यापूर्वी काँग्रेसकडून मोठी घोषणा
गुजरातमध्ये मागील 27 वर्षांपासून सत्तेबाहेर असलेल्या काँगेसने दुसऱया टप्प्यापूर्वी राजकीयदृष्टय़ा मोठे पाऊल उचलले आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर काँग्रेसने राज्यात सत्तेवर आल्यास ओबीसी नेत्याला मुख्यमंत्रिपद देणार असल्याची घोषणा केली आहे. याचबरोबर तीन उपमुख्यमंत्री नेमणार असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. एक दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याक समुदायाशी संबंधित नेत्याला उपमुख्यमंत्री करणार असल्याचे आश्वासन पक्षाकडून देण्यात आले आहे.
काँग्रेसने गुजरातमध्sय यावेळी 125 जागा जिंकण्याचे लक्ष्य बाळगले आहे. राज्यात पक्षसंघटनेची धुरा जगदीश ठाकोर यांच्या हातात आहे. तर आदिवासी नेते सुखराम राठवा हे विधानसभेतील विरोधीपक्षनेते आहेत.
उच्चस्तरीय बैठकीनंतर निर्णय
1 डिसेंबर रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडल्यावर अहमदाबादमध्ये काँग्रेस नेत्यांची उच्चस्तरीय बैठक पार पडली आहे. यात पहिल्या टप्प्यातील मतदानाची समीक्षा करण्यासह अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. राज्य काँग्रेस समितीने या निर्णयांची माहिती राहुल गांधी यांना दिली आहे. या बैठकीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह राज्य काँग्रेस समितीचे सदस्य आणि गुजरातचे प्रभारी डॉ. रघू शर्मा उपस्थित होते. राज्यात सध्या केवळ 89 जागांसाठी मतदान पार पडले आहे. तर अद्याप 93 जागांवर मतदान होणे शिल्लक आहे. अशा स्थितीत काँग्रेसचा हा निर्णय मतदारांवर प्रभाव पाडणारा ठरू शकतो.