सत्ताधारी, विरोधी आमदार चर्चा करण्यास तयार
प्रतिनिधी /पणजी
येत्या विधानसभा अधिवेशनात म्हादईच्या विषयावर चर्चा करण्याची तयारी सभापती रमेश तवडकर यांनी दर्शवली असून तसा प्रस्ताव आल्यास किंवा मागणी झाल्यास त्यावर विचार करता येईल, असे निवेदन त्यांनी केले आहे. त्यामुळे पुढील आठवडय़ात होऊ घातलेल्या 4 दिवसांच्या हिवाळी अधिवेशनात म्हादई प्रश्नावर चर्चा होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
आमदारांनी योग्य त्या मार्गाने प्रक्रिया करुन तसा प्रस्ताव पाठवल्यास त्यावर विचार होईल. म्हादई संदर्भात गोव्याचे हित जपणे ही सर्व आमदारांची जबाबदारी आहे. कामकाज सल्लागार मंडळाच्या बैठकीतही तो विषय घेऊन त्याचा कामकाजात समावेश करायचा की नाही हे ठरवणे शक्य आहे, असेही तवडकर यांनी बोलून दाखवले आहे.
विधानसभा अधिवेशनात म्हादईवर चर्चा व्हावी अशी विरोधी पक्षीय आमदारांची मागणी आहेच. शिवाय सत्ताधारी पक्षाचे आमदारांचे मतही तसेच आहे. त्यामुळे या चर्चेला कोणाचा विरोध असणार नाही. विधानसभेत चर्चा करण्यात यावी, अशी मागणी सातत्याने होत असून त्याच अनुषंगाने सभापती रमेश तवडकर यांनी सदर निवेदन केले आहे.