Tarun Bharat

वाद निर्माण केल्यास पक्षाबाहेर काढणार!

चिपळुणात राज ठाकरेंचा पदाधिकाऱयांना सज्जड दम

प्रतिनिधी/ चिपळूण

  कोकणचा दौरा करताना मला येथील लोकांकडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आशा-अपेक्षा असल्याचे त्यांच्या चेहऱयांवरून स्पष्टपणे दिसत आहे. सर्व राजकीय पक्षाना कंटाळलेला हा समाज आहे. ज्यांच्याकडून अपेक्षा होत्या ते सर्व राजकीय पक्ष अयशस्वी ठरलेले आहेत. त्यामुळे त्यांची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी पक्षाकडून लागणारी सर्व ती ताकद तुम्हाला मिळेल. मात्र पदांवर बसलेल्या प्रमुख पदाधिकाऱयांनी वाद केलेत तर लाथ मारून बाहेर काढेन, असा सज्जड दम मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सोमवारी येथे पदाधिकाऱयांना दिला.

   शहरातील धवल मार्ट सभागृहात पदाधिकाऱयांबरोबर आयोजित संवाद बैठकीत मार्गदर्शन करताना संघटनेत सुरू असलेल्या अंतर्गत वादावरही पदाधिकाऱयांना चांगलाच डोस दिला. मी पाठी फिरलो की तुमचे वाद सुरू होतात. यापुढे वाद निर्माण केलात तर याद राखा. आपल्याच माणसाजवळ वाद कसले करता. एकमेकांचे पाय ओढत बसण्यापेक्षा सर्वांनी पक्षासाठी, कोकणच्या विकासासाठी वाद घाला. यावेळी त्यांनी तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष आणि जिल्हा सचिव यांना पुढे बोलवत त्यांचा अभ्यास घेतला. महिलामध्येही वाद आहेत. पण आता बस्स झाले. नाही तर कायमची कार्यकारिणी बरखास्त करेन. पदावरून कोण गेला तर लगेच पाळत ठेवली जाते, यापेक्षा जनतेच्या प्रश्नावर नजर ठेवा, असेही ठाकरे यांनी सुनावले.

  इथे नवा-जुना काही नाही. मी पंचवीस वर्षे काम करतो आहे असे जर कोणी सांगितले, तर त्याचा पक्षाला काय उपयोग झाला? नुसते पंचवीस वर्षे बरोबर राहून काय उपयोग, असा सवाल ठाकरे यांनी करून काम करणाऱयांना यापुढे संधी दिली जाईल. इथे किती वर्षे कोण आहे हे महत्वाचे नाही. पदाधिकाऱयांनी जर वाद घातले तर मला कळवा, असे स्पष्ट बजावले. त्यावेळी मला काय बोलायचे आहे ते मी बोलेन. आता फक्त पदाधिकाऱयांजवळ संवाद आहे. मुबईमध्ये असणारे पदाधिकारी लवकरच आपल्या इथे येऊन काम करतील, असे सांगितले.

  यावेळी अमित ठाकरे, मनसेचे नेते शिरीष सावंत, माजी आमदार नितीन सरदेसाई, मनसेचे राज्य उपाध्यक्ष अनिल खानविलकर, जिल्हा महिला आघाडी संपर्कप्रमुख स्नेहल जाधव, सतीश नारकर, जिल्हा सचिव संतोष नलावडे, माजी तालुकाध्यक्ष बंडय़ा राजेशिर्के आदी पदाधिकारी उपस्थित होते.

   नागरिकांच्या भेटीगाठी

   सोमवारी चिपळूण बचाव समितीचे राजेश वाजे, अरूण भोजने, महेंद्र कासेकर यांनी आज राज ठाकरे यांची भेट घेतली. मोडक समितीने तयार केलेला अहवाल खोटा आहे त्याची फेर तपासणी व्हावी आणि चिपळूणमध्ये गाळ काढण्यासाठी जास्तीत जास्त मशिनरी मिळावी, ब्लू लाईन आणि रेड लाईन संदर्भात फेरसर्व्हे व्हावा, अशी विनंती यावेळी करण्यात आली. त्याचबरोबर चिपळूण क्रेडाई, कोयना प्रकल्पाच्या स्थानिक बेरोजगार तरूणानीही भेट घेऊन व्यथा मांडल्या.

Related Stories

दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया

Anuja Kudatarkar

रत्नागिरी : कोकण मार्गावर गांधीधाम-तिरुनेलवेली ७ डिसेंबरपासून धावणार

Archana Banage

शिरोडा-वेळागर येथे बुडालेल्या युवकाचा मृतदेह आढळला

Anuja Kudatarkar

हळवल येथील ‘क्वारंटाईन’ असलेल्या युवकाचा मृत्यू

NIKHIL_N

फिशरमेन्स काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी नंदकिशोर कांदळगावकर

Anuja Kudatarkar

अज्ञाताने रिक्षासह तीन दुचाकी जाळल्या

Patil_p