Tarun Bharat

हिम्मत असेल तर सरकार पाडून दाखवा

एकनाथ शिंदे यांचे आव्हान; राजेंद्रसिंह यादवांसह यशवंत आघाडीचा शिंदे गटात प्रवेश

प्रतिनिधी/ कराड

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार अडीच वर्ष नक्की कोण चालवत होते, हे सर्वांना माहीत आहे. शिवसेनेचे सरकार असतानाही शिवसैनिकांवरच अन्याय होत होता. त्यामुळे 50 बहाद्दर आमदारांनी मला हा निर्णय घ्यायला लावला. गेल्या 4 महिन्यात आम्ही धडाडीने लोकहिताचे निर्णय घेत आहोत. त्यामुळे विरोधकांचा जळफळाट होत आहे. काहीही टीका सुरू आहे. पण त्यांनी टीका करण्यापेक्षा हिम्मत असेल तर हे सरकार पाडून दाखवावे, असे आव्हान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना दिले. केवळ चार महिन्यात आम्ही एवढय़ा मोठय़ा प्रमाणात निर्णय घेतले आहेत आणि दोन वर्षानंतर काय घडेल, याचा विचार करूनच आज आमच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेत अनेकजण प्रवेश करीत आहेत, असा दावा त्यांनी केला.

बाळासाहेबांची शिवसेना गटाचा मेळावा येथील दत्त चौकात पार पडला. कराड नगरपालिकेतील यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांच्यासह पदाधिकारी व माजी नगरसेवकांनी यावेळी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला. पालकमंत्री शंभूराज देसाई, उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार महेश शिंदे, आमदार शहाजीबापू पाटील यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी यावेळी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

  एकनाथ शिंदे म्हणाले, आम्ही गद्दारी केली असा आरोप आमच्यावर करतात; पण खरेतर टीका करणाऱयांनी बाळासाहेब ठाकरे विचारांशी व हिंदुत्वाशी गद्दारी केली आहे. आम्ही तर त्याला कामाने उत्तर देत आहोत. हा मिंदे गट नव्हे तर हा बाळासाहेबांच्या विचारांचा सच्चा शिंदे गट आहे. आम्ही जे करायचं ते उघड करतो. लपून-छपून काहीच करीत नाही. मी फक्त काम करत राहणार व महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणार आहे.

बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते, मला एक दिवस पंतप्रधान करा मी काश्मीरमधील 370 कलम हटवून दाखवतो. ते तेच काम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी करून दाखवले आहे. तर राम मंदिराचे बांधकाम ही पूर्ण होत आहे. बाळासाहेबांचे तेच विचार पुढे घेऊन आम्ही निघालो आहोत. अशावेळी टीकाकारांनी गजानन कीर्तिकर, रामदास कदम यासारखे नेते माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर विश्वास ठेवून माझ्याबरोबर का येतात, याचे आत्मचिंतन केले तर बरे होईल असा सल्लाही त्यांनी दिला. कितीही संकटे आली तरी आम्ही हिंदुत्वाशी गद्दारी करणार नाही. राज्यात मुख्यमंत्री शिवसेनेचा असताना शिवसैनिकांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही. हाच विश्वास मी सगळ्यांना देतोय तो लोकांना पटतोय म्हणून तर दररोज पक्षप्रवेश होत आहेत, असे ते म्हणाले.

शहराच्या विकासाचे ध्येय ठेवून प्रवेश-यादव

राजेंद्रसिंह यादव भूमिका स्पष्ट करताना म्हणाले की, एकनाथ शिंदे हे आपले वाटणारे, तळागाळातून आलेले नेतृत्व आहे. कराडचा सर्वांगीण विकास हेच ध्येय ठेवून आम्ही प्रवेश करत आहोत. यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी ऍम्पिथिएटर, म्युरल्स, संत सखू मंदिराला क वर्ग दर्जा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सुशोभीकरण अशा विविध कामासह शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी सहकार्य व्हावे.

जाणत्या राजानं सगळं पळवलं

साताऱयाला आजपर्यंत जाणत्या राजाने काहीच दिलं नाही. उलट सातारचं पाणी, धरण सगळं पळवलं. त्यांनी नेहमीच आपल्या सर्वांना फसवलं, अशी टीका आमदार महेश शिंदे यांनी केली.

सातारचे नेतृत्व मोठं करा

एकनाथ शिंदे हे सर्वसामान्य माणसातलं नेतृत्व आहे. ते सातारचे सुपुत्र आहेत. त्यांच्या पाठीशी इथल्या जनतेने ठाम उभे राहून सातारचे नेतृत्व मोठे केले पाहिजे असे आवाहन आमदार शहाजी पाटील यांनी यावेळी केले.

जयवंतराव शेलार यांनी प्रास्ताविक केले. यावेळी शिंदे यांचा राजेंद्रसिंह यादव यांनी नागरी सत्कार केला. दलित पँथरचे प्रदेशाध्यक्ष सुखदेव सोनवणे, महाबळेश्वरच्या स्वप्नाली शिंदे, कुमार शिंदे यांनी शिंदे गटात प्रवेश केला.

चौकट पान 1 ला घेणे

कराडच्या विकासासाठी 50 नव्हे 100 खोके देऊ

खोके कोठे जात होते, हे सांगायला लावू देऊ नका. तुमचे खोके बंद झाले म्हणून तुम्ही आमच्यावर टीका करत आहात, असा टोला एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला. राजेंद्रसिंह यादव यांनी केलेल्या मागण्यांची दखल घेताना, मुख्यमंत्री म्हणाले की, आमच्यावर खोके सरकार म्हणून विरोधक टीका करतात. आमचे खोके हे विकासाचे आहे. कराडच्या विकासासाठी 50 नव्हे तर 100 खोके देऊ. कराडसह सातारा जिल्हय़ाच्या विकासासाठी निधी कमी पडून देणार नाही. तुम्ही ज्या विश्वासाने प्रवेश केला आहे, त्या विश्वासास तडा जाऊ देणार नाही.

Related Stories

जम्मू काश्मीरमध्ये दोन बसमध्ये स्फोट

Amit Kulkarni

उ. कोरियाने डागली आणखी दोन क्षेपणास्त्रे

Patil_p

कोरोना नियंत्रणासाठी महिलांचा पुढाकार

Patil_p

पाटणा साखळी बॉम्ब स्फोट प्रकरणातील चौघांना फाशीची शिक्षा

Archana Banage

नोव्हेंबरपर्यंत गरिबांना मोफत गहू, डाळ देणार; हरियाणा सरकारचा निर्णय

Tousif Mujawar

Maharashtra Floor Test LIVE Update : विधानसभेत सत्ताधारी- विरोधकांच्या आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी

Abhijeet Khandekar