यंदाचा भारतीय चित्रपट महोत्सव 20 ते 28 नोव्हेंबरपर्यंत : माहिती व प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांची घोषणा
प्रतिनिधी /पणजी
गोव्यात दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱया भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची (इफ्फी) तारीख निश्चित झाली असून 20 ते 28 नोव्हेंबर 2022 या दरम्यान हा महोत्सव होणार आहे.
फ्रान्समध्ये आयोजित 75 व्या कान्स चित्रपट महोत्सवात भारतीय दालनाचे उद्घाटन केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांच्याहस्ते करण्यात आले. त्याच प्रसंगी त्यांनी आंचिमच्या अधिकृत पोस्टरचेही अनावरण केले आणि आंचिमची तारीख जाहीर केली. यंदाचा हा 53 वा आंचिम असून कान महोत्सवात ठाकूर यांच्यासमवेत भारतीय चित्रपट श्रृष्टीतील अनेक मान्यवरांची उपस्थिती आहे. त्यात प्रामुख्याने शेखर कपूर, ए. आर. रेहमान, दीपिका पदुकोण, आर. माधवन, नवाजुद्दीन सिद्दीकी, प्रसून जोशी यासारखे दिग्गज कलाकार तसेच राजस्थानी लोककलाकार मामे खान, माहिती व प्रसारण सचिव अपूर्व चंद्रा, फ्रान्समधील भारताचे राजदूत जावेद अश्रफ आदींचा समावेश आहे.