साबालेन्का, कॅरोलिन गार्सिया यांचे आव्हान उपांत्य फेरीत समाप्त
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
जागतिक अग्रमानांकित पोलंडच्या इगा स्वायटेकने अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेत महिला एकेरीची अंतिम फेरी गाठताना आर्यना साबालेन्काचा पराभव केला तर टय़ुनिशियाच्या ऑन्स जेबॉरने कॅरोलिना गार्सियाला हरवून अंतिम फेरी गाठली आहे. शनिवारी या दोघींत जेतेपदाची लढत होईल. स्वायटेक पहिल्यांदाच या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचली आहे तर जेबॉरची या वर्षातील दुसरी ग्रँडस्लॅम अंतिम फेरी असून या स्पर्धेत पहिल्यांदाच ती इथवर पोहोचली आहे.
सहाव्या मानांकित बेलारुसच्या साबालेन्काने पहिला सेट जिंकून अंतिम फेरी गाठण्याच्या दिशेने पाऊल टाकले होते. पण स्वायटेकने नंतरच्या दोन सेट्समध्ये शानदार प्रदर्शन करून साबालेन्कावर 3-6, 6-1, 6-4 अशी मात केली. ‘साबालेन्काविरुद्ध खेळताना तुमच्याकडे भरपूर ताकद असावी लागते आणि तिचे वेगवान फटके परतवण्याची क्षमता असावी लागते. पहिल्या सेटमध्ये मी यातच थोडी कमी पडले. नंतर काही फटके अचूक लागल्यानंतर ही ताकद मला मिळाली आणि त्यामुळे मी हा सामनाही जिंकू शकले,’ असे स्वायटेक सामन्यानंतर म्हणाली. या विजयानंतर अमेरिकन ओपनची अंतिम फेरी गाठणारी ती पोलंडची पहिली महिला टेनिसपटू बनली आहे.
पहिल्या सेटमध्ये साबालेन्काने संघर्ष करणाऱया स्वायटेकवर 4-2 अशी आघाडी घेतल्यानंतर सेट जिंकून बढत घेतली. पण दुसऱया सेटमध्ये स्वायटेकने आपला खेळ उंचावला आणि चांगली सर्व्हिस करून तीन बेकपॉईंट्स मिळवित सेट जिंकत बरोबरी साधली. निर्णायक सेटमध्ये साबालेन्काने प्रारंभी 2-0 अशी आघाडी घेतली. पण स्वायटेकने जोरदार प्रतिकार करीत तिला 4-4 व गाठले आणि नंतर सेट जिंकून या स्पर्धेची पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठली. स्वायटेकने याआधी प्रेंच ओपन स्पर्धा दोनदा जिंकली असून तिसरे ग्रँडस्लॅम पटकावण्याची संधी तिला प्राप्त झाली आहे.
जेबॉरचा एकतर्फी विजय
पाचव्या मानांकित ऑन्स जेबॉरने फ्रान्सच्या 17 व्या मानांकित कॅरोलिन गार्सियाचा 6-1, 6-3 असा एकतर्फी धुव्वा उडवित या स्पर्धेची पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठली. तिने या सामन्यात आठ बिनतोड सर्व्हिस केल्या. या स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारी ती पहिली आफ्रिकन महिला आहे. जेबॉरने या लढतीत प्रारंभापासून अखेरपर्यंत गार्सियावर वर्चस्व गाजवत एक तास सहा मिनिटांत सामना संपवला. गेल्या जुलैमध्ये तिने विम्बल्डनची अंतिम फेरी गाठली होती. त्यावेळी हुकलेले जेतेपद पटकावण्यासाठी यावेळी ती जोरदार प्रयत्न करेल. ‘विम्बल्डननंतर माझ्यावर बरेच दडपण आले होते. पण त्यातून सावरत मी यश मिळविले याचे समाधान वाटते. हार्डकोर्ट मोसमाची सुरुवात खराब झाली होती, तरीही मी येथे अंतिम फेरीपर्यंत पोहोचले, याचा खूप आनंद वाटतो,’ असे 28 वर्षीय जेबॉर म्हणाली. जेबॉरने गार्सियावर आजवर पूर्ण वर्चस्व गाजवले असून कनिष्ठ ग्रँडस्लॅममध्येही तिने गार्सियाला चार वेळा तर व्यावसायिक टेनिसमध्ये दोन ग्रँडस्लॅममध्ये हरविले आहे. गार्सियाने या स्पर्धेआधी सिनसिनॅटी मास्टर्स स्पर्धा जिंकली होती आणि तिची सलग 13 सामन्यांची मालिका अखेर जेबॉरने खंडित केली.
जेबॉर व स्वायटेक यांच्यात आतापर्यंत चार लढती झाल्या असून दोघींनी प्रत्येकी दोन लढती जिंकल्या आहेत.