Tarun Bharat

अज्ञानी लोक ज्ञतेपणाचा आव आणून हा संसार खरा आहे असे सांगतात

अध्याय चोविसावा

अध्यायात, नाथमहाराज प्रकृती पुरुषाबद्दल सविस्तर विवरण करणार आहेत. ते म्हणाले, हे ओंकारस्वरूपा गुणातीता! तुला नमस्कार असो. हे व्यक्तिरहिता! हे अव्यक्ता! तुझ्यामध्ये द्वैताची गोष्टच नाही कारण सर्व चराचराला तूच व्यापलं आहेस म्हणून तू अद्वैतामध्येच राहणारा आहेस. अद्वैत हेच तुझे स्वतःचे ठिकाण आहे. ज्याप्रमाणे हवेने सर्व आकाश व्यापलेलं आहे त्याप्रमाणे तू सर्व विश्व व्यापलेलं आहेस, तेव्हा हे उघड आहे की, तेथे इतर कुणाला जागाच नाही. येथे देवी-देव इत्यादि भेद नाहीत. उदय-अस्त नाहीत कारण सूर्य आणि चंद्र ह्यांना तेथे जागाच नाही. तेथे शब्दासह वेद लीन झाला. बुद्धीला ज्ञान हे मिथ्या वाटू लागले. तेथे तिळभरही भेद नाही. सर्वत्र एक अद्वयानंदच भरलेला आहे. असं  अद्वैतपण सर्वत्र भरून राहिलेलं असताना प्रकृतिपुरुषाची कहाणी केवळ अज्ञानी लोक ज्ञातेपणाचा मोठा आव आणून आणि चातुर्याने सांगतात. ती सांगताना ते काय काय कल्पना लढवतात ते पाहून मन चकित होतं. खरं तर इथं  मीपणा व तूपणा यांना बिलकुल स्थान नाही कारण एकीएक निर्गुण, निराकार परमात्माच सगळीकडं भरून राहिला आहे. मग येथे प्रकृती आणि पुरुष यांना स्थान कोठून मिळणार? जो कधी गर्भातसुद्धा असण्याचा संभव नाही, त्याची जन्मपत्रिका वर्तवतात! जो जन्मालाच आला नाही, त्याचे श्राद्ध करतात. हे ज्ञात्यांना विचारले असता काही ठिकाणा लागत नाही. वांझेच्या मुलाचा विवाह आहे, तो समारंभ पाहावयाला चला! असे म्हंटले तर तो अज्ञान्यास खरा व ज्ञान्यास खोटा असतो, तसाच प्रकार प्रकृती-पुरुषाचा आहे. असे केवळ नसलेलेच, मिथ्या, पण ते खरे असल्याप्रमाणे सांगितले आणि एकांतालाच अनेकपणाने दाखवले, तरीही त्याचे एकपण न मोडता तसेच राहते. असा एकपणाने एकच असून तो आपणच आपली पत्नी झाला आणि आपल्या पत्नीचा पतीही स्वतःच झाला. हे विलक्षण लाघव अतक्मर्य आहे.

ज्याप्रमाणे अर्धनारीनटेश्वराच्या मूर्तीत जो पुरुष तोच स्त्री असतो, त्याप्रमाणे संसारांत प्रकृती आणि पुरुष एकरूपानेच नांदत असतात. तो पुरुष आणि ती पतिव्रता ह्या दोघांची एकात्मभावाने अत्यंत प्रीती आहे. ती परस्परांपासून वेगळी होऊन कधी पाऊलसुद्धा टाकीत नाहीत. दोघांचे सदोदित एकत्रच राहणे असते, दोघांना नेसणे एकच, दोघांचे बसणे एकाच सत्तेखाली असते दोघांचे प्रेम कसे अलौकिक आहे! ती एकमेकांशिवाय विषसुद्धा घ्यावयाची नाहीत. एकमेकांशिवाय पाणीही पीत नाहीत. एकमेकांशिवाय आंधळीच असतात. त्यात बायकोचे कृत्य तर विलक्षणच! त्या नपुंसकाला हिने पुरुषत्व द्यावयाचे आणि मग तिच्याच आधीन होऊन पुरुषाने सदोदित राहावयाचे! असा प्रकार असतो. मग हा तिच्याच डोळय़ांनी पाहतो, तिच्याच तोंडाने बोलतो, तिच्यामुळेच हा सुखदुःखे भोगतो, तिच्यामुळेच बंधमोक्ष भोगतो

तिच्यामुळेच ‘मी ब्रह्म’ असे म्हणवितो, तिच्यामुळे हा कर्माकर्म करतो आणि तिच्यामुळेच हा धर्माधर्माच्या परिणामाप्रमाणे मरण आणि जन्म भोगतो. तिच्यामुळेच याला पातक घडते, तिच्यामुळेच याला पुण्य मिळते, तिच्यामुळेच हा महत्त्वाला चढतो आणि तिच्यामुळेच अधःपाताने पडतो. येथपर्यंत अत्यंत प्रीतीने आपली प्रकृती त्या पुरुषाने वाढविली आणि प्रकृतीनेही पतिव्रताधर्मानं राहून आपला पती अगदी आपल्याला वश करून ठेविला. त्या दोघांचे नातेही मोठे आश्चर्यकारक आहे. ही दोघेही सख्खी भावंडे असतात किंवा तो बाप व ती त्याची कन्या असंही नातं असू शकतं. आणखी विचार केला तर तो तिचा पुत्रही होतो! खरं म्हंटलं तर बाप आणि कन्या, आई आणि मुलगा यांच्यात शरीर सबंध शास्त्राला मान्य नाही. तरीही त्या दोघांनी तिसरेपणाचा संपर्क न होऊ देता अनेक लोक उत्पन्न केले त्यासाठी व्यभिचार केला व संसार वाढविला. तो शंकर इत्यादिकांनाही अत्यंत अतक्मर्य, अगोचर, अगम्य व दुर्धर असा आहे.

क्रमशः

Related Stories

योग्य कान टोचणी

Patil_p

जनताभिमुख होण्याची गरज !

Patil_p

‘वन नेशन वन हेल्थ कार्ड’: सुलभता आणि आव्हाने

Patil_p

।। नका करू नाश आयुष्याचा ।।

Patil_p

संवादातून मार्ग शोधा

Patil_p

गोदाकाठी शब्दांची दाटी!

Patil_p