वृंदावन कॉलनीत गेल्या कित्येक महिन्यापासून सांडपाणी रस्त्यावर
प्रतिनिधी /बेळगाव
महांतेशनगर वृंदावन कॉलनी येथील ड्रेनेजच्या दुरुस्तीसाठी महापालिकेकडे सातत्याने तक्रार करण्यात आली. मात्र याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे परिसरातील रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दुर्गंधी आणि सांडपाणी नळाच्या जलवाहिनीमध्ये मिसळत असल्याने रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
शहरातील ड्रेनेजवाहिन्या तुंबण्याचे प्रकार वाढले आहेत. ड्रेनेजवाहिन्यांच्या दुरुस्तीसाठी आणि देखभालीसाठी कोटीच्या निविदा काढल्या जातात. त्याचप्रमाणे नवीन ड्रेनेजवाहिन्या घालण्यासाठी निधी खर्च केला जातो. तरीदेखील शहर आणि उपनगरातील ड्रेनेज समस्या जैसेथे आहेत. त्यामुळे खर्ची घातलेला निधी जातो कुठे, असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. महांतेशनगर, रामतीर्थ अपार्टमेंटच्या मागील बाजुस असलेल्या वृंदावन
कॉलनीमधील ड्रेनेजवाहिन्या तुंबल्याने याबाबत महापालिकेकडे तक्रार करण्यात आली होती. ही समस्या गेल्या कित्येक महिन्यापासून भेडसावत असून, याबाबत मनपाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असता आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाहणी केली. त्यानंतर दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला. तात्पुरती दुरुस्ती करून निघून गेले. या समस्येचे निवारण झाल्यानंतर काही दिवसांनी पुन्हा ड्रेनेजवाहिनी तुंबली आहे.
नागरिकांना दूषित पाणीपुरवठा
दुरुस्तीसाठी खोदण्यात आलेला ख•ा पूर्णपणे सांडपाण्याने भरला असून, परिसरात सांडपाणी वाहत आहे. रस्त्यावर वाहणाऱ्या सांडपाण्यामुळे वाहनधारकांना आणि रहिवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. या समस्येमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत.
सांडपाणी जलवाहिनीमध्ये मिसळत असल्याने काही नागरिकांना दूषित पाणीपुरवठा होत आहे. या समस्येचे निवारण कायमस्वरूपी करण्यात यावे, अशी मागणी मनपाच्या अधिकाऱ्यांकडे केली होती. पण याकडे कानाडोळा करण्यात आल्याने रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ड्रनेजवाहिनीची दुरुस्ती तातडीने करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.