सुविधांपासून जनावरे वंचित, पशुवैद्यांवर ताण, शेतकऱ्यांना फटका, बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट
प्रतिनिधी /बेळगाव
पशुसंगोपन खात्यातील निम्म्याहून अधिक जागा रिक्त असल्याने जनावरांना वेळेत उपचार आणि इतर सुविधा मिळेनाशा झाल्या आहेत. त्यातच लम्पी विषाणूजन्य रोगाने धुमाकूळ घातल्याने पशुसंगोपनची डोकेदुखी वाढली आहे. पशुवैद्यांची कमतरता असल्याने जनावरांना वेळेत उपचार देणे कठीण झाले आहे. त्यातच लम्पीचा प्रादुर्भाव वाढल्याने कार्यरत असलेल्या पशुवैद्यांवर कामाचा ताण वाढला आहे. त्यामुळे पशुसंगोपन खात्यातील रिक्त जागा तातडीने भरणे आवश्यक आहे.
जिल्ह्यातील उपसंचालक पशुवैद्यकीय अधिकारी, पर्यवेक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत. त्यामुळे कार्यरत असलेल्या पशुवैद्यांवर व कर्मचाऱ्यांवर ताण वाढला आहे. परिणामी जनावरांना सोयीसुविधा पुरविताना खाते कमी पडत आहे. दरम्यान, पशुपालक शेतकऱ्यांना खासगी डॉक्टरांचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे आर्थिक भुर्दंडही बसत आहे. शिवाय काही बोगस डॉक्टरांकडून चुकीचे उपचार होत आहेत. त्यामुळे जनावरे दगावण्याचे प्रकार देखील घडू लागले आहेत. अशा परिस्थितीत शासनाने पशुवैद्यांच्या जागा भरून दिलासा देणे आवश्यक आहे. पशुसंगोपन मंत्री प्रभू चव्हाण यांनी मध्यंतरी पशुसंगोपन खात्यातील रिक्त जागा भरण्याचा आदेश दिला होता. मात्र अद्याप या आदेशाची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे पशुसंगोपनच्या कामाचा ताण सद्यस्थितीत असलेल्या पशुवैद्यांवरच सुरू आहे. त्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहेत.
जिल्ह्यात 28 लाख 9 हजार 109 इतकी जनावरांची संख्या आहे. त्यामध्ये गाय, म्हैस, बैल, शेळ्या, मेंढ्या, कुत्रा, मांजर, गाढव, डुक्कर आदींचा समावेश आहे. अलिकडे जनावरांची संख्या वाढली आहे. मात्र त्या तुलनेत पशुवैद्यकीय दवाखाने आणि पशुवैद्यांची संख्या अगदी नगण्य आहे. त्यामुळे पशुपालक शेतकऱ्यांना जनावरांच्या सुविधांपासून वंचित रहावे लागत आहे. जिल्ह्यात 28 लाख जनावरांची संख्या असली तरी त्या तुलनेत लहान-मोठे केवळ 271 दवाखाने आहेत. त्यामुळे जनावरांना सुविधा पुरविण्यात खाते संपूर्ण अपयशी ठरत आहे.
15 ते 20 गावचा कार्यभार एकाच पशुवैद्यावर
शासनाच्या नियमानुसार दर 5 हजार जनावरांमागे एक पशुवैद्यकीय अधिकारी आणि प्रत्येक गावात पशु वैद्यकीय दवाखाना असणे आवश्यक आहे. मात्र सद्यस्थितीत 20 हजार जनावरांमागे देखील एक पशुवैद्यकीय डॉक्टर नाही. शिवाय 15 ते 20 गावचा कार्यभार एकाच पशुवैद्यावर सोपविण्यात आला आहे. इतकी गंभीर परिस्थिती असतानाही रिक्त जागा भरण्याकडे दुर्लक्ष झाल्याने शेतकऱ्यांतून नाराजी आहे. विशेषत: लसीकरण, कृत्रीम रेतन, अनुदान, आरोग्य शिबिरे, प्रदर्शने, गणती आदी कामात अडचणी निर्माण होत आहेत. काही ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखाना 25 ते 30 कि. मी. अंतरावर आहे. त्यामुळे जनावरांना दवाखान्याकडे घेऊन जाणे अशक्य आहे. त्यामुळे जनावरांना उपचारापासून वंचित रहावे लागत आहे.
लवकरच रिक्त जागा भरल्या जातील
जिल्ह्यात पशुवैद्यकीय अधिकारी, तांत्रिक कर्मचारी आणि इतर कर्मचारी अशा 35 टक्क्यांहून अधिक जागा रिक्त आहेत. याबबात शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला आहे. जागा भरण्यासाठी मंजुरी देखील मिळाली आहे. लवकरच रिक्त जागा भरल्या जातील.
-डॉ. राजीव कुलेर (सहसंचालक, पशुसंगोपन खाते)
तालुक्यात 1 लाख 78 हजार 75 जनावरे
बेळगाव तालुक्यात 1 लाख 78 हजार 75 इतकी जनावरांची संख्या आहे. मात्र त्या तुलनेत केवळ 22 पशु चिकित्सालय दवाखाने आहेत. त्यामुळे पशुपालक शेतकऱ्यांना खासगी डॉक्टरांवरच अवलंबून रहावे लागत आहे. काही ठिकाणी एका पशुवैद्यावर दोन दवाखान्यांचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. त्यामुळे जनावरांना उपचार मिळेनासे झाले आहेत. त्यातच लम्पी रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खासगी डॉक्टरांकडूनच उपचार करून घ्यावे लागत आहेत.
जिल्ह्यातील एकूण जनावरांची संख्या
- तालुका गाय व बैल म्हैस मेंढी शेळी डुक्कर
- अथणी 77917 128149 47675 70420 4331
- बैलहोंगल 55561 55513 32398 26466 1806
- बेळगाव 56469 76541 308590 27479 1285
- चिकोडी 45771 138415 130273 51367 1338
- गोकाक 94043 115243 118977 95838 6569
- हुक्केरी 39198 89868 120770 57890 3121
- खानापूर 45847 45240 434 13180 36
- रायबाग 77682 112699 106185 57094 731
- रामदुर्ग 51591 33690 107938 51680 2659
- सौंदत्ती 48754 34012 93415 40131 3729