विरोधकांनी बोलावलेल्या बैठकीत समर्थकांची प्रचंड घोषणाबाजी, पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती नियंत्रणात, शेवटी बैठक रद्द करण्याचा प्रसंग, दोन्ही गटांचे आरोप – प्रत्यारोप
प्रतिनिधी /सांगे
सांगे येथील श्रीसन प्लाझा सभागृहात कोठार्ली येथील नियोजित ‘आयआयटी’ला विरोध करण्यासाठी आयोजित बैठकीत आयआयटी समर्थकानी प्रकल्पाचे समर्थन करत प्रचंड घोषणाबाजी करून गोंधळ निर्माण केला. त्यामुळे समर्थक आणि विरोधक यांच्यात संघर्ष निर्माण झाल्याने बैठकीचे कामकाज पुढे न जाता बैठक रद्द झाली. यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. बैठकीच्या सभागृहाच्या खाली देखील विरोधक आणि समर्थकांत शाब्दिक बाचाबाची होत होती. एकूण चित्र पाहता समर्थकांची संख्या विरोधकांपेक्षा जास्त होती. बराच काळ वातावरण तंग होते.
नियोजित प्रकल्प ज्या जागेत होणार आहे तेथील शेतकरी आणि पर्यावरणाच्या नावाखाली प्रकल्प विरोधकांनी ही बैठक आयोजित केली होती. किरागाळ पाणीवाटप संस्थेचे अध्यक्ष कॉस्तांव मास्कारेन्हस यांनी आयआयटी प्रकल्पाला विरोध करण्यासाठी व शेतकऱयांपुढे मते मांडण्यासाठी बैठकीचे आयोजन केले होते. पण बैठक सुरू होऊन अभिजित प्रभुदेसाई यांनी बोलण्यात सुरुवात केल्यावर सुमारे दोनशे-अडीचशे आयआयटी समर्थकांनी सभागृहात प्रवेश केला व आम्हाला आयआयटी प्रकल्प पाहिजे म्हणून नारा केला. केपेचे उपअधीक्षक नीलेश राणे यांनी दोन्ही गटांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला व त्यांना सभागृहाबाहेर जाण्याची विनंती केली. त्यानंतर काही वेळात आयआयटी प्रकल्प विरोधकांनी बोलावलेली बैठक रद्द झाली.
…आणि समर्थक खवळले
आयोजकांकडून बैठकीला उपस्थित राहणाऱया लोकांची एका रजिस्टरवर सही घेतली जात होती. या रजिस्टरच्या एका पानावर आयआयटीला विरोध करत असल्याचा मजकूर लिहिला होता. त्यामुळे आयआयटी समर्थकांनी आयोजकांना ‘रजिस्टर द्या, आम्ही आमची सही खोडून काढतो’ असे सांगितले असता, आयोजकांनी सदर रजिस्टर दिला नाही. तसेच सांगेबाहेरील एनजीओ प्रतिनिधीला विरोधकांनी बैठकीला पाचारण केल्याने समर्थक खवळले.
त्यामुळे समर्थकांकडून प्रचंड घोषणाबाजी सुरू झाली. समर्थकांच्या वतीने मळकर्णे येथील राजेश गावकर यांनी व्यासपीठावरून आयआयटी समर्थनार्थ बोलण्यास सुरुवात केली. ते म्हणाले की, नियोजित आयआयटीसंदर्भातील जमीन सरकारी मालकीची आहे. किरकोळ शेतकऱयांचा प्रश्न आहे. तो देखील सरकारकडून सोडविला जाईल, असे त्यांनी सांगितले. यादरम्यान समर्थकांकडून ‘आमका जाय, आमका जाय, आयआयटी जाय’ अशा घोषणा दिल्या जात होत्या. याचदरम्यान त्यांच्या हातातील माईक एका विरोधकाने हिसकावून घेतल्याने प्रकरण चिघळले. याचदरम्यान उपअधीक्षक राणे, सांगेचे पोलीस निरीक्षक विनायक पाटील यांनी पोलीस फौजफाटय़ासह दोन्ही गटांशी संवाद साधून प्रकरण नियंत्रणात आणले.
तेव्हा विरोधक मते मांडण्यास आले नाहीत : गावकर
याविषयी बोलताना आयआयटी समर्थक राजेश गावकर म्हणाले की, गेल्या 3 जुलै रोजी याच सभागृहात आयआयटी विषयावरील मते जाणून घेण्यासाठी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत विरोधकांनाही आपली मते मांडण्यास सांगितले होते. पण कुणी विरोधक मते मांडण्यासाठी पुढे आला नाही. रविवारी आयोजित केलेल्या बैठकीत शेतकरी सोडून बाहेरील व्यक्तीला बोलायला दिले जाणार नाही, असे सांगण्यात आले होते. पण अभिजित प्रभुदेसाई ही व्यक्ती बाहेरची असल्याने आयआयटी समर्थकांनी घोषणा देत सभागृहात प्रवेश केला, असे ते म्हणाले.
आयआयटी समर्थकांत जिल्हा पंचायत सदस्य सुरेश केपेकर, अलका फळदेसाई, रिवणचे माजी सरपंच सूर्या नाईक, उगेचे माजी सरपंच उदय देसाई, माया जांगली, भारती नाईक, राजेश गावकर, दीपक नाईक, बायो भंडारी, गौरीश नाईक, प्रसाद नाईक, रोहन तारी व इतरांचा समावेश राहिला.
सांगेत लोकशाही राहिलेली नाही : डिकॉस्ता
नगरसेवक मेशू डिकास्ता म्हणाले की, शेतकऱयांना आयआयटी व आयटीआय यातील फरक पटवून सांगण्यासाठी बैठक बोलावली होती. ही बैठक सुरू होताच समर्थकांनी सभागृहात येऊन गोंधळ घातला. सांगेत लोकशाही राहिलेली नाही. यापुढे सांगेत सभा देखील घेणे कठीण होऊन बसेल, असे ते म्हणाले.
आयआयटी होऊ देणार नाही : विरोधकांचा निर्धार
सदर बैठकीच्या व्यासपीठावर लीना डिकॉस्ता, मारिया क्रूझ, कॉस्तांव मास्कारेन्हस, तिओतीन डिकॉस्ता, नगरसेवक मेशू डिकॉस्ता, सुनील गावकर व इतर मान्यवर उपस्थित होते. प्रकल्पाच्या समर्थकांनी आमची बैठक उधळून लावली, असा आरोप आयआयटी विरोधकांनी केला असून सांगेत कोणत्याही परिस्थितीत आयआयटी होऊ देणार नाही, असा निर्धार या शेतकऱयांनी केला आहे.
मंत्र्यांच्या पत्नीला अपशब्द वापरल्याने प्रकरण आणखी तापले दरम्यान, सांगेचे आमदार तथा समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांच्या पत्नी अलका फळदेसाई यांना विरोधकांपैकी एकाने अपशब्द उचारल्याने प्रकरण तापले. सदर व्यक्ती कारमधून पळून जात असताना आयआयटी समर्थकांनी कारला अडविण्याचा प्रयत्न केला असता विरोधी गटातील एका महिला रस्त्यावर पडली. नंतर याच कारने दांडा येथे एका स्कूटरलाही घड़क दिली. सांगे पोलीस स्थानकात हे प्रकरण पोहोचले असून पोलीस तपास करत असल्याची माहिती मिळाली आहे.