Tarun Bharat

आयआयटी विरोधकास अटक, तिघांना वॉरंट

सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल अटक-वॉरंट : शेतकरी व अन्य आंदोलक, नागरिकांमध्ये सर्वेक्षणाबाबत संभ्रम

प्रतिनिधी /सांगे

कोठार्ली, सांगे येथे नियोजित आयआयटीविरोधी आंदोलक आणि पोलीस यांच्यामध्ये सोमवारी झालेल्या संघर्षाच्या पार्शभूमीवर सांगे पोलिसांनी मंगळवारी सकाळी आयआयटी विरोधक जोसेफ फर्नांडिस यांना सरकारी कामात तसेच सर्व्हे करण्यात अडथळा आणल्याप्रकरणी अटक केल्याची माहिती सांगे पोलीस स्थानकातून मिळाली. अन्य तीन आंदोलक फिलीप वाझ, महिला आंदोलक मारिया वाझ आणि स्विजल क्रूझ यांना अटक करण्यासाठी वॉरंट बजावण्यात आले आहे. सध्या वातावरण तापत असून अशा परिस्थितीत आंदोलन चिघळण्याची भीती व्यक्त होत आहे.

सोमवारी आंदोलकांनी सर्व्हेचे काम अडविण्याबरोबर पोलिसांना वाटेतच अडवून पुढे जाण्यास मज्जाव केला होता. पोलिसांनी रस्ता मोकळा करण्याचा तीन वेळा इशारा देऊनही शेवटपर्यंत आंदोलकांनी न ऐकल्याने अखेर पोलीस बळाचा वापर करून रस्ता खुला करण्यात आला होता. यावेळा पोलीस आणि विरोधक यांच्यात संघर्ष होऊन झटापट झाली होती. पोलिसांनी विरोधकांना अक्षरशः ढकलून बाजूला काढत रस्ता खुला केला होता. वास्तविक गेल्या शनिवारपासून आयआयटी विरोधक आक्रमक झाले होते. कोणत्याही परिस्थितीत नियोजित जागेत आयआयटी नकोच असा पवित्रा आंदोलकानी घेतला आहे.

मंगळवारीही काही महिलांनी मांडले ठाण

सोमवारी पोलीस-आंदोलक यांच्यात संघर्ष होऊनही मंगळवारी सकाळी पत्रकारांच्या एका तुकडीने नियोजित आयआयटीच्या जागेवर भेट दिली असता सुमारे 20 ते 25 महिला ठाण मांडून असल्याचे दिसून आले. तुम्ही येथे का आला आहात, असे विचारले असता, सर्व्हे चालू आहे का हे पाहण्यासाठी, असे उत्तर मिळाले. सांगे पोलीस कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्यासाठी सतर्क झालेले असून पुरेसा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे तसेच राखीव फौजफाटा तयार ठेवलेला आहे, अशी माहिती मिळाली.

सर्व्हेचे सहा पॉईंट्स अधोरेखित व्हायचे होते

आयआयटी होऊ घातलेल्या जागेत बऱयाच दिवसांपासून सर्वेक्षण चालू होते आणि ते सोमवारी संपणार होते. केवळ सहा सर्व्हे पॉईंट्स अधोरेखित करणे बाकी होते. हे वृत्त नंतर सोमवारी आंदोलकांना समजले. आंदोलकांच्या दाव्यानुसार, संबंधित शेतकऱयांना तसेच आंदोलकांना विश्वासात न घेता जमिनीचे सर्वेक्षण चालू करून सीमा अधोरेखित करण्यासाठी दगड घातले गेल्यामुळे नागवे, कोठार्ली, वरकटो भागांतील शेतकऱयांत अधिक संभ्रम निर्माण झाला. प्रत्यक्षात शेतकरी एक सांगतात आणि आयआयटी होऊ घातलेल्या जमिनीत शेती नाहीच असे सांगितले जाते, त्यातच सरकारी यंत्रणेचे अधिकारी काही स्पष्ट सांगत नाहीत अशी एकूण परिस्थिती निर्माण झाली. येथील शेतकरी आणि अन्य ग्रामस्थांचा आमच्या शेतात आयआयटी नको हाच नारा आहे. या आंदोलनात महिलांचा सहभाग लक्षणीय राहिलेला आहे.

आयआयटी सरकारी जमिनीत : फळदेसाई यांची भूमिका

स्थानिक आमदार व समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी आयआयटी सरकारी जमिनीत येणार असल्याचे वारंवार सांगितलेले आहे. तसेच येथे शेती, माड किंवा इतर उत्पन्न देणारी झाडे नाहीत असे स्पष्ट करून हा विरोध गैरसमजातून आणि राजकीयदृष्टय़ा होत असल्याचे त्यांनी म्हटलेले आहे. सदर सरकारी जमिनीत काही अतिक्रमणे असून त्यांची विरोधकांना जास्त फूस आहे, असे फळदेसाई यांनी यापूर्वीच म्हटलेले आहे.

सर्व्हे पॉईंट्स कळल्यानंतर विरोध वाढला

मधल्या काळात आयआयटीला विरोध करणारा आवाज थंडावला होता. तसेच जमिनीचे सर्वेक्षण चालू होते. मात्र सर्व्हे पॉईंट्स नागवे येथील कपेल, स्मशानभूमी येथे निश्चित केल्याने अचानक विरोध वाढत गेला. दोन दिवसांआधी आंदोलकांनी चिंच-नागवे आणि त्यानंतर वरकटो, दांडो येथे बैठका घेऊन विरोध दर्शविला व पुढील रणनीती निश्चित केली.

आयआयटी सरकारी जागेत होणार : मुख्यमंत्री

सोमवारी रात्री मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपल्या आल्तिनो येथील बंगल्यावर समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, मुख्य सचिव, जिल्हाधिकारी, महसूल खात्याचे आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी यांची बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. लोकांनी नकारात्मक मानसिकतेतून बाहेर आले पाहिजे. आयआयटी प्रकल्प गोव्यासाठी गरजेचा आहे. नियोजित जमीन सरकारी मालकीची आहे. कुणी अतिक्रमण करून दावा करत असेल, तर त्याचे सर्वेक्षण होईल. जर कोणी कूळ असतील, तर त्यांना नुकसान भरपाई दिली जाईल. कोणावरही अन्याय होऊ देणार नाही, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले आहे.

मंगळवारी पणजीत बोलताना मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले की आयआयटी संकुल ही गोव्याची गरज आहे. प्रकल्पांना विरोध करण्याची लोकांना सवय झाली आहे, ती बदलायला हवी. नियोजित जागा सरकारची आहे. त्यापैकी काही जागेत अनेकांनी बेकायदेशीरपणे अतिक्रमणे केली आहेत. त्या जागेचे सर्वेक्षण करताना संबंधितांची बैठक बोलाविली जाईल. कोणी कुळ असेल तर त्यांच्यावर अन्याय होणार नाही.

नियोजित आयआयटीच्या ठिकाणी जमावबंदी लागू

दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकाऱयांनी सांगे येथील नियोजित आयआयटी संकुलासभोवती मंगळवारी संचारबंदीचा आदेश जारी केला आहे. आदेशानुसार फौजदारी आचार संहितेचे 144 कलम जारी करण्यात आले आहे. या कलमानुसार नियोजित आयआयटी संकुलाच्या 200 मीटर परिसरात 5 किंवा त्याहून ज्यादा लोकांना एकत्र येता येणार नाही. सांगे तालुक्यातील कोठार्ली गावच्या 21/1 क्रमांकाच्या सर्व्हेमध्ये वरील नियोजित प्रकल्प येणार आहे.  आयआयटी संकुलासाठी जागा मोजण्याच्या प्रक्रियेत आडकाठी आणण्याच्या उद्देशाने येणाऱयांसाठी हा आदेश लागू होणार असल्याचे जिल्हाधिकाऱयांच्या आदेशात स्पष्ट करण्यात आलेले आहे.

Related Stories

तळपण येथील समुद्राच्या पाण्याचा रंग बनला हिरवा

Patil_p

वास्कोत कार्निव्हल मिरवणुक उत्साहात

Amit Kulkarni

कोरोनाचे गांभीर्य ओळखून मास्कचा योग्यरीत्या वापर करा

Amit Kulkarni

सेक्स स्कँडल प्रकरण येणार काँग्रेसच्याच अंगलट?

Patil_p

आदी हिशेब द्या, नंतरच नवीन समिती स्थापन करा !

Amit Kulkarni

प्रा. माधव सटवाणी यांना कालिदास पुरस्कार जाहीर

Amit Kulkarni
error: Content is protected !!