ऑनलाईन टीम / तरुण भारत :
एक कोटी रुपयांची अपसंपदा जमवल्याप्रकरणी पुणे महापालिकेच्या उपायुक्तासह त्याच्या पत्नीवर कोथरुड पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित उपायुक्ताच्या घराची आज सकाळपासून झाडाझडती सुरू आहे. पालिकेचा मोठा अधिकारी एसीबीच्या गळाला लागल्याने खळबळ उडाली आहे.
विजय भास्कर लांडगे (वय ४९) आणि शुभेच्छा विजय लांडगे (४३) अशी गुन्हा दाखल झालेल्या पती-पत्नीची नावे आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक भारत साळुंखे यांनी त्यांच्याविरोधात तक्रार दिली आहे.
विजय लांडगे (वय ४९) हे आकाश चिन्ह विभागात उपायुक्त पदावर कार्यरत आहेत. त्यांनी पत्नी शुभेच्छा लांडगे यांच्या नावे तब्बल १ कोटी २ लाख ६० हजार रुपयांची अपसंपदा जमवल्याची तक्रार प्राप्त झाली होती. दरम्यान, लाचलुचपत विभागाने याची चाचपणी केली, तक्रारीत तथ्य असल्याचे लक्षात आल्यानंतर आज सकाळी लांडगे यांच्या घरावर धाड टाकण्यात आली. दिवसभर लांडगे दाम्पत्याची चौकशी सुरू होती. लांडगे आणि कुटुंबियांच्या नावावर पुण्यात 4 आणि नाशिकमध्ये 1 अशा 5 मालमत्ता आहेत. तपासादरम्यान लांडगे यांनी उत्पन्नापेक्षा तब्बल ३१.६९ टक्के जास्त अपसंपदा पत्नीच्या नावे जमा केल्याचे आढळले. त्यानंतर पोलिसांनी कोथरुड पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल केला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या शीतल घोगरे पुढील तपास करत आहेत.