अचानक सुरु झालेल्या कामाने गावात खळबळ
प्रतिनिधी / पणजी
ओझरार-पोडोशे, पर्ये येथे कोणीतरी पंचायतीकडून व इतरांकडून परवानगी न घेताच बेकायदेशीरपणे भूखंड तयार करण्याचे काम सुरू केले आहे. या संदर्भात तेथील ग्रामस्थांनी पंचायतीकडे तक्रार मांडलेली आहे. हे सर्व भूखंड कर्नाटकातून आलेल्या अल्पसंख्यकांनी खरेदी करण्यास प्रारंभ केल्याने त्या परिसरात खळबळ उडाली आहे.
‘ओझर’ पोडोशे या पर्ये ग्रामपंचायतीच्या अत्यंत दुर्गम भागात ‘शॉवेल’ आणून डोंगर परिसरात रस्ते तयार करण्याचे काम ऐन सुट्टीच्या दिवसांत सुरू केले आहे. गुरुवारपासून रविवारपर्यंत सलग चार दिवस सुट्टी असल्याने कोणीही प्रशासकीय अधिकारी येणार नाही, अशी संधी साधून काहीजणांनी शॉवेलच्या आधारे रस्ते तयार करण्याचे काम सुरू केले आहे. या ठिकाणी भूखंड पाडले जात असून बहुतांश हे हुबळी, धारवाड, तसेच बिजापूर इत्यादी भागातील अल्पसंख्याक भाजी, फळ, फूल विक्रेते घेत असून तिथे एक कॉलनी उभारण्याचा डाव ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
सरपंच शेटय़े यांनी सदर कामाची पहाणी करण्यास पंचायतीच्या एका कारकुनाला पाठवून काम त्वरित बंद करण्यास भाग पाडले आहे.
सरपंच आत्माराम शेटय़े यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की आमच्या पंचायतीकडून अशी कामे करण्यासाठी कोणीही परवानगी घेतलेली नाही. आम्ही बेकायदा बांधकामांना मुळीच थारा देणार नाही.
राजकीय दबावाचा वापर करून त्या परिसरात बेकायदेशीर भूखंड तयार करण्याची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.