जिल्हा सीईएन विभागाची कारवाई : कोल्हापूर, बेळगाव येथील दोघांना अटक : 240 पोत्यांसह ट्रक ताब्यात
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगावहून कोल्हापूरला नेण्यात येत असलेला बेकायदा तांदूळसाठा पोलिसांनी जप्त केला आहे. गुरुवारी पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील मणगुत्ती क्रॉसजवळ जिल्हा सीईएन विभागाने ही कारवाई केली असून रेशन तांदळाची 240 पोती जप्त करण्यात आली आहेत.
याप्रकरणी कोल्हापूर व बेळगाव येथील दोघा जणांना अटक करण्यात आली आहे. यमकनमर्डी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.
अल्लाबक्ष मुसेन्ना मुजावर (रा. राजेंद्रनगर, कोल्हापूर), अहम्मद बशीरअहम्मद तारवाले (रा. वीरभद्रनगर) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा जणांची नावे आहेत. जिल्हा सीईएन विभागाचे पोलीस निरीक्षक वीरेश दोडमनी, अन्न निरीक्षक अब्दुलखादर मीरासाब कमनूर, पोलीस उपनिरीक्षक नागनगौडा कट्टीमनीगौडर, आर. ए. शिंदे, एल. वाय. खिलारगी, एन. आर. फडय़ाप्पण्णावर, एम. बी. बेन्नी व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे.
एमएच 09 एल 2104 क्रमांकाच्या ट्रकमधून सुमारे 1 लाख 79 हजार 340 रुपये किमतीचे 11 हजार 956 किलो रेशनचे तांदूळ कोल्हापूरला नेण्यात येत होते. पोलिसांनी जप्त केलेल्या ट्रकची किंमत 5 लाख रुपयांइतकी आहे. यासंबंधी यमकनमर्डी पोलीस स्थानकात कलम 3, सहकलम 7, अत्यावश्यक वस्तू कायदा 1955 अन्वये ही कारवाई करण्यात आली आहे.
अटक करण्यात आलेल्या दोघा जणांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांची रवानगी हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. यापूर्वीही बैलहोंगल, मुरगोड पोलिसांनी बेकायदा तांदूळ वाहतूक प्रकरणी कारवाई केली आहे. बेळगाव जिल्हय़ातून मोठय़ा प्रमाणात रेशनच्या तांदळाचा काळाबाजार होतो.