वनविभाग, महापालिका-हेस्कॉमला निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
वंटमुरी कॉलनी सेक्टर क्रमांक 7 येथे धोकादायक झाड असून ते कधी कोसळेल, याची शाश्वती नाही. तेव्हा तातडीने झाड हटवावे, अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी वनविभाग, महापालिका आणि हेस्कॉमकडे केली आहे. यापूर्वीही अशी मागणी करण्यात आली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाले असून तातडीने ते झाड काढून टाकावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
वंटमुरी कॉलनी येथील धोकादायक झाड विद्युत तारांच्या शेजारीच आहे. तर एका बाजूला घरे आहेत. झाडाचा बुंधा खराब झाला आहे. तेव्हा याचा गांभीर्याने विचार करावा आणि तातडीने झाड तोडावे. गेल्या काही महिन्यांत शहरामध्ये अनेक झाडे कोसळली आहेत. जोरदार वारा आणि पाऊस यामुळे झाडे कोसळून एकाचा मृत्यू झाला. तसेच दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेवरून तरी तातडीने ही झाडे हटवावी, अशी मागणी होत आहे.
यापूर्वीच वनविभागाला अशोक गिऱयाप्पा इंगळे राहणार वंटमुरी यांनी निवेदन दिले आहे. नोव्हेंबर 2021 मध्ये वनविभागाला निवेदन दिले होते. याचबरोबर हेस्कॉम आणि महापालिकेलाही निवेदन देण्यात आले आहे. मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी तातडीने हे झाड हटवावे, अशा मागणीचे निवेदन पुन्हा त्यांनी दिले आहे.